कर्नाटक सरकारचा टिपू सुलतान जयंतीचा कार्यक्रम उधळण्याची विश्व हिंदू परिषदेची धमकी

By Admin | Published: November 6, 2015 01:50 PM2015-11-06T13:50:30+5:302015-11-06T13:50:30+5:30

टिपू सुलतानची जन्मशताब्धी साजरी करण्याच्या कर्नाटकच्या मनसुब्यांना हिंदुत्ववादी संघटनांनी कडाडून विरोध केला असून सदर समारंभ उधळवण्याची धमकी दिली आहे.

Vishwa Hindu Parishad threat to expel Karnataka government's Tipu Sultan Jayanti program | कर्नाटक सरकारचा टिपू सुलतान जयंतीचा कार्यक्रम उधळण्याची विश्व हिंदू परिषदेची धमकी

कर्नाटक सरकारचा टिपू सुलतान जयंतीचा कार्यक्रम उधळण्याची विश्व हिंदू परिषदेची धमकी

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
बेंगळुर, दि. ६ - टिपू सुलतानची जन्मशताब्धी साजरी करण्याच्या कर्नाटकच्या मनसुब्यांना हिंदुत्ववादी संघटनांनी कडाडून विरोध केला असून सदर समारंभ उधळवण्याची धमकी दिली आहे. संघ परीवारातल्या संघटनांनी केवळ हिंदू विरोधी प्रतिमा असल्याचे सांगत टिपू सुलतानच्या गौरवास विरोध केलेला नाही, तर हा समारंभ १० नोव्हेंबर रोजी म्हणजे ऐन दिवाळीत होत असल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. 
विश्व हिंदू परीषदेच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करत राज्याचे माहिती मंत्री रोशन बेग यांनी टिपूची २६६वी जयंती राज्य सरकार साजरी करणार असल्याचे सांगितल्याचे वृत्त टेलीग्राफने दिले आहे. अत्यंत कडेकोड सुरक्षा असलेल्या राज्य सरकारच्या इमारतीमध्ये हा समारंभ होणार असल्यामुळे कार्यक्रम उधळण्याच्या धमक्यांचा काही परिणाम होणार नसल्याचे बेग म्हणाले आहेत. 
या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या करणार असून साहित्यिक गिरीष कर्नाड, बारगूर रामचंद्रप्पा आणि इतिहासकार शेख अली, तालकड चिकरांगे गोवडा व एन. व्ही. नरसिंह उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
म्हैसूरचा वाघ अशी प्रतिमा असलेल्या टिपू सुलतानचा मृत्यू ब्रिटिशांशी लढताना झाला होता. टिपूच्या कल्पक नीतीची दखल नोपोलियन बोनापार्टनेदेखील घेतल्याचे सांगितले जाते.
मात्र, आता टिपू सुलतान जयंती राज्य सरकार साजरी करणार असल्याचे समजल्यावर राज्यात राजकीय दुफळी निर्माण झाल्याचे दिसत आहे. मंगलोर व चित्रदुर्ग येथे विश्व हिंदू परिषदेने काल निदर्शने केली आहेत. संपूर्ण राज्यात १० नोव्हेंबर पर्यंत निदर्शने करण्यात येणार असल्याचे परिषदेचे राज्य सचिव टी.ए.पी शेणॉय यांनी सांगितले. 
हिंदूंचा ज्यांनी छळ केला त्या टिपूच्या सन्मानासाठी राज्य सरकार कसा करदात्यांचा पैसा उधळत आहे, हे बजरंग दलाचे कार्यकर्ते जनतेला सांगतिल असंही परीवारातील नेत्यांनी म्हटलं आहे. 
भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनीही टिपू जयंती साजरी करण्यास विरोध केला आहे. जी. मधुसूदन या भाजपा आमदाराच्या मते टिपू हा स्वातंत्र्यवीरही नव्हता आणि युद्धनायकही नव्हता, त्यानं स्वत:चं राज्य वाचवण्यासाठी इंग्रजांशी लढा दिला.
भारताविरोधात लढण्यासाठी टिपूने अफगाणिस्तानच्या अहमद शाह अब्दालीला आवतण दिल्याचा दाखला मधुसूधन यांनी दिला आहे. टिपूने हिंदूंची मंदीरे फोडली आणि कुर्ग व मलाबारमधल्या अनेक हिंदूंचं सक्तीनं धर्मांतर केलं असा दावाही मधुसूदन यांनी केला आहे. 
तर, टिपूनं मंदीरं फोडल्याचा वा धर्मांतर घडवून आल्याचा पुरावा नसल्याचं म्हणणं गोवडा या इतिहासकारांचं आहे. 
टिपू सुलतान युनायटेड फ्रंटचे अध्यक्ष यांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत करताना आमच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना यश आल्याचं म्हटलं आहे. त्यांची संस्था दरवर्षी टिपूच्या जयंतीनिमित्त मान्यवरांचा सत्कार करते ज्यामध्ये मानचिन्ह व २५ हजार रुपयांचा समावेश आहे. गेल्या वर्षी हा पुरस्कार तिस्ता सेटलवाड यांना देण्यात आला.

Web Title: Vishwa Hindu Parishad threat to expel Karnataka government's Tipu Sultan Jayanti program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.