पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त करणार ‘विश्वकर्मा’चा प्रारंभ, समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणाकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 09:17 AM2023-09-16T09:17:58+5:302023-09-16T09:18:17+5:30
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वकर्मा योजना सुरू करणार आहेत. या योजनेमुळे समाजातील दुर्बल घटकांचे आर्थिक सबलीकरण होईलच शिवाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वर्गाकडे मोठा समुदाय म्हणून पाहिले जात आहे.
- संजय शर्मा
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वकर्मा योजना सुरू करणार आहेत. या योजनेमुळे समाजातील दुर्बल घटकांचे आर्थिक सबलीकरण होईलच शिवाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वर्गाकडे मोठा समुदाय म्हणून पाहिले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीतील द्वारका येथे एका मोठ्या समारंभात १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ज्या विश्वकर्मा योजनेचा उल्लेख करण्यात आला होता, त्याच विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ करणार आहेत. ही विश्वकर्मा योजना १७ सप्टेंबर रोजी देशभरातील ७० शहरांमध्ये एकाच वेळी सुरू होणार आहे.
यांना मिळणार लाभ...
या योजनेंतर्गत सुतार, लोहार, सोनार, गवंडी, नाभिक, माळा बनवणारे, परिट, शिंपी, कुलूप तयार करणारे, चर्मकार, बूट तयार करणारे, सुतार, चटई किंवा झाडू बनवणारे, मासेमारीचे जाळे तयार करणारे, टूल किट बनवणारे, खेळणी बनवणारे आदींना प्रशिक्षण देऊन त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी १ लाख रुपयांपर्यंतची मदत केली जाईल, तर २ लाख रुपयांचा दुसरा हप्ता दिला जाईल.
प्रशिक्षणादरम्यानही त्यांना दररोज ५०० रुपये आणि १५ हजार रुपयांचे टूल किटही दिले जाणार आहे. त्यांना प्रशिक्षण आणि आर्थिक साह्य देऊन त्यांची उत्पादने बाजारात पाठवण्याची व्यवस्थाही सरकार करील.
राजकीयदृष्ट्या प्रभावी ठरणार
विश्वकर्मा योजना दुर्बल वर्गाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आहे; परंतु भाजप ही योजना राजकीयदृष्ट्या प्रभावी मानते कारण यात येणारा समुदाय मोठा आहे.