काव्यातून मानवी जीवनाच्या पैलूंचे दर्शन; प्रख्यात कवी गुलझार यांना ज्ञानपीठ पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 07:44 AM2024-02-18T07:44:07+5:302024-02-18T07:44:41+5:30
गुलझार यांनी उर्दूबरोबरच पंजाबी, हिंदी या भाषांतही काव्यरचना केली आहे.
जगण्याच्या विविध पैलूंचे दर्शन घडविणारे, चित्रपट गीतांना अमोल असे साहित्यिक मूल्य प्राप्त करून देणारे प्रख्यात कवी गुलजार यांना २०२३ सालासाठी जाहीर झालेला ज्ञानपीठ पुरस्कार हा एक प्रकारे उर्दूबरोबरच अन्य भाषांचाही गौरव आहे. गुलझार यांनी उर्दूबरोबरच पंजाबी, हिंदी या भाषांतही काव्यरचना केली आहे.
गुलजार यांना २००२ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, २००४ साली पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. २००९ मध्ये डॅनी बॉयल दिग्दर्शित स्लमडॉग मिलियनेयर या चित्रपटासाठी लिहिलेल्या जय हो या गाण्याला सर्वश्रेष्ठ गाण्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. या गाण्याला ग्रॅमी पुरस्कारही मिळाला होता. गुलजार यांचे मूळ नाव संपूर्णसिंह कालरा, त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १९३६ रोजी पंजाबमधील दीना गावात झाला, भारताच्या फाळणीनंतर हे गाव पाकिस्तानात समाविष्ट झाले. फाळणीनंतर गुलजार यांचे कुटुंब पंजाबमधील अमृतसर येथे स्थायिक झाले.
विविध क्षेत्रांत केली अतुलनीय कामगिरी
■ गुलजार यांनी चौरस रात (लघुकथा), जानम (काव्यसंग्रह), एक बूँद चाँद, रावी पार, रात, चाँद और में, रात पश्मिने की, खरारों अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत.
■ आशीर्वाद, आनंद, खामोशीसारख्या चित्रपटांची पटकथा, संवाद त्यांनी लिहिले. मेरे अपने, कोशिश, आंधी, मौसम, अंगूर, नमकीन आदी चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. अनेक चित्रपटांची गाणी गुलझार यांनी लिहिली आहेत.
गुलजार यांच्या कर्तृत्वाचा प्रत्येक पैलू तेजोमय
• डाव्या विचारसरणीचे गुलजार यांना पूर्वी आकर्षण वाटत असे. त्यामुळेच ते काही गीतकारांच्या संपर्कात आले होते. गुलजार यांच्या कर्तृत्वाचा प्रत्येक
पैलू तेजोमय आहे. ● विमल रॉय यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करत असताना त्यांचे अनुभवविश्व विस्तारले. गुलजार यांनी बंदिनी चित्रपटातील 'मोरा गोरा अंग लड़ ले' हे गाणे लिहिले. हृषिकेश मुखर्जी यांचे सहाय्यक म्हणून काम करत असताना गुलजार यांना खऱ्या अर्थाने यशाची चव चाखायला मिळाली.
मेकॅनिक म्हणूनही केले काम
मुंबईत त्यांनी वरळी येथे एका गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम केले. तिथे ते मोकळ्या वेळात पुस्तके वाचू लागले. लहानपणापासून असलेली लिहिण्याची, वाचण्याची आवड आणखी वाढीस लागली. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. प्रख्यात दिग्दर्शक विमल रॉय, हृषिकेश मुखर्जी, गायक हेमंतकुमार यांचे सहायक म्हणून त्यांनी काम सुरू केले. विमल रॉय यांच्या बंदिनी' या चित्रपटासाठी त्यांनी आपले पहिले गीत लिहिले. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या कवितांचा गुलजार यांनी अनुवाद केला आहे.