पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 19:21 IST2025-04-22T18:04:40+5:302025-04-22T19:21:20+5:30

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद साधला.

Visit the site of the incident PM Modi instructions to HM Amit Shah from Saudi Arabia after Pahalgam terror attack | पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी आहेत. त्यातील काहीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, दोन दहशतवादी लष्कराच्या गणवेशात आले आणि त्यांनी एका पर्यटकाला त्याचे नाव विचारले आणि त्याच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरु केला. यामध्ये इतर पर्यटक जखमी झाले. या हल्ल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत गृहमंत्री अमित शाह यांना तिथे जाण्यास सांगितले आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि या प्रकरणात ठोस आणि कठोर कारवाई करण्यास सांगितले. पंतप्रधानांनी गृहमंत्री अमित शाह यांना घटनास्थळी भेट देण्यास सांगितले आहे.

या हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. उपराज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, सीआरपीएफचे महासंचालक, जम्मू आणि काश्मीरचे महासंचालक आणि लष्कराचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर अमित शाह यांनी दहशतवाद्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही असे म्हटले. अमित शाह बीएसएफच्या खास हेलिकॉप्टरने श्रीनगरला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत आयबी प्रमुख आणि गृहसचिव देखील आले आहेत. तिथे पोहोचल्यावरही अमित शाह हे एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत.

दरम्यान, पहलगाम हल्ल्याबाबत सुरक्षा यंत्रणांनी मोठा खुलासा केला आहे. दहशतवादी दक्षिण काश्मीरमधील एका पर्यटन स्थळाला लक्ष्य करू शकतात अशी पूर्वसूचना होती. दहशतवादी धर्माच्या नावाखाली बिगर-काश्मिरींना लक्ष्य करू शकतात, अशी ही माहिती होती. त्या जागेची रेकी दहशतवाद्यांकडून आधीच करण्यात आली होती. जमिनीवरून मिळणाऱ्या मदतीमुळे दहशतवाद्यांना येथे शस्त्रे पोहोचवण्यात यश आले, असे सुरक्षा यंत्रणेचे म्हणणं आहे.

सोडणार नाही; पहलगाम हल्ल्यावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

"पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. लोकांना शक्य तितकी सर्व मदत पुरवली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना शिक्षा होईल त्यांना सोडले जाणार नाही! त्यांचा अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आपला निर्धार आणखी मजबूत होईल," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Web Title: Visit the site of the incident PM Modi instructions to HM Amit Shah from Saudi Arabia after Pahalgam terror attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.