पंतप्रधान मोदींनी नेमली आर्थिक सल्लागार परिषद, अध्यक्षपदी विवेक देबरॉय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:15 AM2017-09-26T00:15:28+5:302017-09-26T00:15:51+5:30
मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला उभरी देण्याची निकड भासत असतानाच पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी पंतप्रधानांना आर्थिक बाबींवर सल्ला देण्यासाठी ‘आर्थिक सल्लागार परिषद’ नेमली.
नवी दिल्ली: मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला उभरी देण्याची निकड भासत असतानाच पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी पंतप्रधानांना आर्थिक बाबींवर सल्ला देण्यासाठी ‘आर्थिक सल्लागार परिषद’ नेमली.
‘संपुआ’ सरकारच्या काळातही अशी परिषद होती परंतु कालांतराने तिचे काम बंद पडले. आता मोदींनी या परिषदेची पुनर्स्थापना केली आहे.
‘नीती’ आयोगाचे सदस्य विवेक देबरॉय हे या परिषदेचे अध्यक्ष असतील तर माजी वित्त सचिव व ‘नीती’ आयोगाचे मुख्य सल्लागार रतन वटाल तिचे सदस्य सचिव असतील. याखेरीज अर्थतज्ज्ञ सुरजीत भल्ला, ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ पब्लिक फायनान्स अॅण्ड पॉलिसी’चे संचालक रथिन रॉय आणि ‘इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट आॅफ डेव्हलपमेंट रीसर्च’च्या प्राध्यापक अशिमा गोयल हे या परिषदेचे सदस्य असतील. महत्वाच्या विषयांचा अभ्यास करून त्यावर पंतप्रधानांना अभिप्राय देणे, हे या परिषदेचे मुख्य काम असेल.