"मुलगी वरच्या बर्थवरून खाली पडली, किंकाळ्या, चेंगराचेंगरी अन्..."; थरकाप उडवणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 12:35 PM2023-10-31T12:35:45+5:302023-10-31T12:42:33+5:30
विजयनगरम जिल्ह्यातील हावडा-चेन्नई मार्गावर एका ट्रेनने सिग्नल ओलांडल्यानंतर दुसऱ्या ट्रेनला धडक दिली. यानंतर डबे रुळावरून घसरले. अपघातातून थोडक्यात बचावलेल्या प्रवाशाने अंगावर काटा आणणारी घटना सांगितली.
आंध्र प्रदेशमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रेल्वेअपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. तर 54 हून अधिक जण जखमी झाले आहेत. विजयनगरम जिल्ह्यातील हावडा-चेन्नई मार्गावर एका ट्रेनने सिग्नल ओलांडल्यानंतर दुसऱ्या ट्रेनला धडक दिली. यानंतर डबे रुळावरून घसरले. अपघातातून थोडक्यात बचावलेल्या प्रवाशाने त्यावेळची अंगावर काटा आणणारी घटना सांगितली आहे.
न्यूज एजन्सीनुसार, ओडिशातील रहिवासी दिलीप कुमार पात्रो नावाच्या प्रवाशाने सांगितले की, तो त्याची पत्नी, 6 वर्षांची मुलगी आणि इतर तीन जण ट्रेनने घरी परतत होते. रविवारी सायंकाळी सात वाजता त्यांना झटका बसला. त्यानंतर काही सेकंदातच जोरदार धक्का बसला आणि संपूर्ण ट्रेनमध्ये गोंधळ उडाला. सर्वजण 'वाचवा-वाचवा' म्हणून ओरडू लागले. हा अपघात झाला तेव्हा त्यांची सहा वर्षांची मुलगी वरच्या बर्थवर होती.
मुलगी खाली पडली. पण सुदैवाने तिला कोणतीही दुखापत झाली नाही. हे सर्व नेमकं कसं घडलं हे माहीत नाही. ट्रेन रुळावरून घसरून दुसऱ्या ट्रेनला धडकली एवढेच माहिती मिळाली. पात्रो यांनी सांगितलं की, अपघातानंतर लगेचच ट्रेनमध्ये चेंगराचेंगरी झाली. सगळे बाहेर पळू लागले. आमच्या जवळच डब्याखाली एक मृतदेह पडलेला मला दिसला. हे बघून माझी प्रकृती बिघडली. पण कसा तरी मी कुटुंबासह कोचमधून बाहेर आलो.
माझी मुलगी रडत होती. बायको घाबरली. असा अपघात मी आयुष्यात विसरू शकणार नाही. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून 54 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळाल्यावर आम्हाला खूप वाईट वाटलं. किती कुटुंबे उद्ध्वस्त झाली कुणास ठाऊक. आम्ही फक्त देवाचे आभार मानत होतो की आमचं कुटुंब वाचलं. हा अपघात मी कधीही विसरू शकणार नाही. लोकांच्या किंकाळ्या आणि चेंगराचेंगरी आठवून भीती वाटते.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आंध्र प्रदेशातील मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये आणि अन्य राज्यातील मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर गंभीर जखमींना 50 हजार रुपयांची मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.