व्हीके पांडियन यांची राजकारणातून निवृत्ती; नवीन पटनायक आणि BJD ची मागितली माफी...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 05:28 PM2024-06-09T17:28:12+5:302024-06-09T17:29:48+5:30
नवीन पटनायक यांचे उत्तराधिकारी मानले जाणारे व्हीके पांडियन यांनी BJD च्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली.
VK Pandian Quits Politics : आज एकीकडे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत, तर दुसरीकडे ओडिशात (Odisha) मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. लोकसभा आणि ओडिशातील विधानसभा निवडणुकीत नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांच्या बिजू जनता दलाचा (BJD) दारुण पराभव झाल्यानंतर आता त्यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले बीजेडीचे नेते व्हीके पांडियन (VK Pandian) यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे.
पांडियन बीजेडीच्या बैठकीलाही उपस्थित नव्हते
व्हीके पांडियन यांनी एक व्हिडिओ जारी करुन आपला निर्णय जाहीर केला. व्हीके पांडियन हे माजी मुख्यमंत्री पटनायक यांचे उत्तराधिकारी मानले जात होते. पण, बीजेडीच्या पराभवानंतर पांडियन यांच्यावर टीकेची झोड उठली. विशेष म्हणजे, व्हीके पांडियन 5 जून रोजी नवीन पटनायक यांच्यासोबत राजीनामा देण्यासाठी राजभवनातही गेले नाहीत आणि त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या बैठकीलाही उपस्थित राहिले नाहीत.
Odisha: BJD Leader VK Pandian Announces Retirement from Active Politics pic.twitter.com/PhY6E18972
— IANS (@ians_india) June 9, 2024
काय म्हणाले पांडियन?
पांडियन यांनी व्हिडिओ जारी करुन म्हटले की, "राजकारणात येण्याचा माझा उद्देश फक्त नवीन बाबू यांना पाठिंबा देणे हा होता. आता मी सक्रिय राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रवासात माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो. माझ्या विरोधात सुरू केलेल्या चुकीच्या नरेटिव्हमुले निवडणुकीत बीजेडीचे नुकसान झाले, त्यामुळे मी संपूर्ण बीजेडी परिवाराची माफी मागतो. बीजेडीच्या लाखो कार्यकर्त्यांना शुभेच्छा."
ओडिशा लोकसभा-विधानसभा निवडणुकीचे निकाल
ओडिशा विधानसभा निवडणुकीत बीजेडीला भाजपकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विधानसभेत 78 जागा जिंकून भाजपने बीजेडीची 24 वर्षांची सत्ता संपवून लावली. नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बीजेडीला 51 जागा मिळाल्या, तर काँग्रेसने 14, माकपने एक जागा जिंकली. विशेष म्हणजे, बीजेडीला लोकसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. दुसरीकडे भाजपने राज्यात लोकसभेच्या 20 जागा काबीज केल्या, तर काँग्रेसने एक जागा जिंकली.