Farmers Protest : "नेता बनण्याच्या चढाओढीत शेतकऱ्यांचे मुद्दे पडले मागे, चांगलं काम करण्यासाठी देवा यांना सबुद्धी दे"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 04:06 PM2021-05-31T16:06:07+5:302021-05-31T16:17:37+5:30
Farmers Protest : शेतकरी आंदोलनात राजकारण केलं जात आहे. तसेच आंदोलनात कुठेतरी आता शेतकऱ्यांचे मुद्दे मागे पडले आहेत. नेता बनण्याच्या चढाओढीत शेतकऱ्यांचे मुद्देच नेतेच विसरून गेले, असं व्ही. एम. सिंग यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर (Farmers Protest) राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे अध्यक्ष व्ही. एम. सिंग यांनी मोठं विधान केलं आहे. शेतकरी आंदोलनात राजकारण केलं जात आहे. तसेच आंदोलनात कुठेतरी आता शेतकऱ्यांचे मुद्दे मागे पडले आहेत. नेता बनण्याच्या चढाओढीत शेतकऱ्यांचे मुद्देच नेतेच विसरून गेले, असं व्ही. एम. सिंग यांनी म्हटलं आहे.
"शेतकऱ्यांच्या हितात काही चांगली कामं करण्यासाठी देवा यांना थोडी सबुद्धी दे. किमान आपलंही आणि शेतकऱ्यांचं तरी भलं करतील. नेत्यांनी शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे. आंदोलन योग्य दिशेने नेले पाहिजे. पण नेता बनण्याच्या चढाओढीत राहण्यापेक्षा शेतकऱ्यांचे मुद्दे पुढे नेले पाहिजेत" असं व्ही. एम. सिंग यांनी म्हटलं आहे. "ऑगस्ट क्रांतीच्या दिवशी म्हणजे 9 ऑगस्टला शेतकरी आंदोलनाचा आवाज आपण उठवला होता. शेतकऱ्यांचं रक्षण व्हावं आणि त्यांच्या कुटुंबाचा फायदा व्हाव, हे आपलं ध्येय असतं."
"शेतकऱ्यांना मार खाऊ घालणं किंवा त्यांना मरणासाठीचा आपला प्रयत्न कधीच राहिलेला नाही. 26 जानेवारीला दिल्लीत जे काही झालं त्यानंतर आपण आंदोलनातून बाहेर पडलो. कारण आंदोलनाला जे स्वरुप दिले गेले ते योग्य नव्हते" असं सिंग यांनी म्हटलं आहे. तसेच "आम्ही शेतकऱ्यांच्या उज्जल भवितव्यासाठी काम करत आलो आहोत, करणार आणि करत राहणार. शेतकऱ्यांचा गहू एमएसपीवर विकण्याचे काम करत आहोत. आमच्या लोकांवर गुन्हेही दाखल केले गेलेत" असं देखील व्ही. एम. सिंग यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.