व्होडाफोनचे ग्रुप सीईओ आठवड्याअखेर भारतात, पंतप्रधानांना भेटण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 04:12 AM2020-03-03T04:12:52+5:302020-03-03T04:12:58+5:30
व्होडाफोनकडून कंपनी वाचवण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचे मानले जाते. या आधी निक रीड म्हणाले आहेत की, एजीआरवर कंपनीला दिलासा मिळाला नाही तर कंपनीचा कारभारच बंद होऊ शकतो.
संतोष ठाकूर
नवी दिल्ली : एजीआर (सकल महसूल समायोजन) प्रकरणावरून संकटात सापडलेल्या व्होडाफोन आयडियाचे ग्रुप सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) निक रीड हे भारतात या आठवड्याअखेर येऊ शकतात. ते पंतप्रधान व दूरसंचार मंत्र्यांची भेट घेऊ शकतात. व्होडाफोनकडून कंपनी वाचवण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचे मानले जाते. या आधी निक रीड म्हणाले आहेत की, एजीआरवर कंपनीला दिलासा मिळाला नाही तर कंपनीचा कारभारच बंद होऊ शकतो.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार निक रीड कंपनीची आर्थिक स्थिती, सध्याची दूरसंचार क्षेत्राच्या अवस्थेचा हवाला देत सरकारच्या वरिष्ठ प्रतिनिधींकडे व्होडाफोन-आयडियाला दिलासा देण्याची मागणी करू शकतात. या आधी दूरसंचार मंत्रालयानेही कंपनीला दिलासा देण्यासाठी तीन प्रस्ताव सादर केलेले आहेत. परंतु, त्यावर अर्थ मंत्रालयाने आक्षेप घेत कोणत्याही कंपनीला विशेष पॅकेज दिले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यावर दूरसंचार मंत्रालयाचे उत्तर होते की, आमचे लक्ष्य दूरसंचार उद्योग वाचवण्याचे आहे व आमचा प्रस्ताव कोणत्याही कंपनीशी संबंधित नाही. संपूर्ण दूरसंचार क्षेत्रासाठीच मध्यम मार्ग काढण्यात यावा. सूत्रांनुसार निक रीड यांनी भारतातील प्रमुख रविंद्र ठक्कर यांच्यासह पंतप्रधान, वाणिज्य मंत्री दूरसंचार मंत्र्यांसह वरिष्ठ नोकरशहांच्या भेटीची वेळ मागितली आहे.