व्होडाफोन, आयडियाच्या विलीनीकरणावर शिक्कामोर्तब
By admin | Published: March 21, 2017 12:46 AM2017-03-21T00:46:47+5:302017-03-21T00:46:47+5:30
रिलायन्स जिओने निर्माण केलेल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी व्होडाफोन आणि आयडिया या दोन बड्या कंपन्या एकत्र आल्या
मुंबई : रिलायन्स जिओने निर्माण केलेल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी व्होडाफोन आणि आयडिया या दोन बड्या कंपन्या एकत्र आल्या आहेत. ब्रिटिश दूरसंचार कंपनी व्होडाफोन आणि भारतातील आदित्य बिर्ला समूहाची आयडिया सेल्युलर यांनी सोमवारी विलीनीकरणाची घोषणा केली. विलीनीकरणानंतर नवी कंपनी ग्राहक आणि महसूल या दृष्टीने भारतातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी ठरेल. ही प्रक्रिया आगामी दोन वर्षांत पूर्ण होईल.
विलीनीकरणानंतरच्या नव्या कंपनीचे नेतृत्व चेअरमन या नात्याने कुमार मंगलम बिर्ला हे करतील. रिलायन्स जिओच्या आगमनानंतर, भारतीय दूरसंचार क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढली आहे.
या स्थितीला तोंड देण्यासाठी आयडिया व व्होडाफोनने हे पाऊल उचलले आहे. एकिकृत कंपनीचा मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) व्होडाफोन ठरवेल. व्होडाफोनचे सीईओ व्हिटोरियो कोलाओ यांनी ही माहिती दिली. कुमार मंगलम बिर्ला यांचीही या वेळी उपस्थिती होती.
समभागांच्या अदला-बदलीने विलीनीकरण पूर्ण केले जाईल.
इंडस टॉवर्समधील व्होडाफोनच्या
४२ टक्के हिस्सेदारीला विलीनीकरणात सहभागी करून घेण्यात आलेले नाही. विलीनीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आदित्य बिर्ला समूहाला ३,८७४ कोटी रुपयांत ४.९ टक्के समभाग हस्तांतरित होतील. ही रक्कम आयडिया देणार नाही. ही रक्कम प्रवर्तकांकडून येईल.
विलीनीकरणानंतर आयडियाचा आकार घटण्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली. नव्या कंपनीत व्होडाफोनची ४५.१ टक्के हिस्सेदारी असेल. आयडिया सेल्युलरची हिस्सेदारी २६ टक्के असेल. उरलेली हिस्सेदारी सार्वजनिक भागधारकांकडे असेल. भागधारक करारानुसार, नव्या कंपनीवर व्होडाफोन आणि आदित्य बिर्ला समूह या दोघांचेही संयुक्त नियंत्रण राहील. (वाणिज्य प्रतिनिधी)
कोणाची किती हिस्सेदारी?-
दूरसंचार नियामक ट्रायच्या आकडेवारीनुसार डिसेंबर २0१६ मध्ये व्होडाफोनची ग्राहकसंख्या २0.४६ कोटी, तर बाजार हिस्सेदारी १८.१६ टक्के आहे. आयडियाची ग्राहकसंख्या १९.0५ कोटी आणि हिस्सेदारी १६.९ टक्के आहे. भारती एअरटेल २६.५८ कोटी ग्राहकसंख्या आणि २३.५८ टक्के हिस्सेदारीसह अव्वल स्थानी आहे.
व्होडाफोन भारतातून गाशा गुंडाळणार?-
व्होडाफोन भारतातून गाशा गुंडाळेल, असे संकेत व्हिटोरियो व बिर्ला यांनी दिले. ते म्हणाले की, ‘आगामी काळात हळूहळू नव्या कंपनीत दोन्ही कंपन्यांची हिस्सेदारी समान होईल.
च्व्होडाफोनच्या कर वादावर याचा परिणाम होणार नाही. दोन्ही ब्रँड स्वतंत्रपणे चालत राहातील. नव्या कंपनीत दोघांचे तीन-तीन प्रतिनिधी असतील.’
विलिनीकरणानंतरची स्थिती-
व्होडाफोन आणि आयडियाच्या विलीनीकरणानंतर एकीकृत कंपनीचा एकूण महसूल ८0 हजार कोटी रुपये असेल. तो दूरसंचार क्षेत्रातील एकूण महसुलाच्या ४३ टक्के असेल.
च्ग्राहकसंख्या ४0 कोटी आणि बाजार हिस्सेदारी ४0 टक्के असेल. कंपनीवरील शुद्ध कर्जाचा बोजा १,0७0 अब्ज रुपये असेल.
नव्या कंपनीला विकावा लागणार स्पेक्ट्रम
एकिकृत कंपनीकडे २५ टक्क्यांपेक्षा जास्त स्पेक्ट्रम हिस्सा असेल. कमाल स्पेक्ट्रम नियमांचे पालन करण्यास, नव्या कंपनीला एक टक्का स्पेक्ट्रम विकावा लागेल. त्याची किंमत सुमारे ५,४00 कोटी असेल.