आवाज माझाच; पण टेपमध्ये फेरफार; कुमारस्वामींकडून राजकारण - येदियुरप्पा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 05:20 AM2019-02-11T05:20:58+5:302019-02-11T05:25:02+5:30
काँग्रेस आमदारांच्या सौदेबाजीसंबंधी कथित संभाषणाच्या वादग्रस्त ध्वनिफितींमधील आवाज आपलाच असल्याची कबुली कर्नाटकातील भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी दिली आहे.
हुबळी : काँग्रेस आमदारांच्या सौदेबाजीसंबंधी कथित संभाषणाच्या वादग्रस्त ध्वनिफितींमधील आवाज आपलाच असल्याची कबुली कर्नाटकातील भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी दिली आहे. मात्र, त्या ध्वनिफितीत फेरफार करून सोयीस्करपणे जारी केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
राज्यातील आघाडी सरकार पाडण्याकरिता जनता दल (एस)चे आमदार नगनगौडा यांना आपल्या बाजूला वळविण्यासाठी त्यांचा मुलगा शरण गौडा याच्याशी येदियुरप्पांनी संभाषण केले होते. त्यावेळी काही कोटी रुपये देण्याचे प्रलोभनही दाखविले गेले, असा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केला होता. त्या कथित संभाषणाच्या ध्वनिफितीही त्यांनी पत्रकारांसमोर उघड केल्या होत्या.
यासंदर्भात येदियुरप्पा म्हणाले की, ध्वनिफीत प्रकरणाच्या निमित्ताने कुमारस्वामी अत्यंत घाणेरडे राजकारण करीत आहेत. देवदुर्ग सर्किट हाऊसमध्ये मी विश्रांती घेत असताना एक व्यक्ती मला भेटायला आली. त्यावेळी सौजन्य म्हणून मी शरणगौडांशी बोललो. त्यांच्या वडिलांना भाजपाकडे वळविण्याचे कारस्थान रचल्याचा कुमारस्वामी यांनी या संभाषणाच्या आधारे केलेला आरोप चुकीचा आहे. चित्रपटसृष्टीतील पूर्वानुभव असल्यामुळे कुमारस्वामी यांनी ही ध्वनिफीत संकलित केली असावी. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी त्यांनी हा सारा खटाटोप केलेला आहे. शरण गौडा यांनी त्यांची व्यथा माझ्यासमोर मांडली होती; पण त्यावेळी माझ्या डोळ्यांवर झोप असल्याने त्यांना दुसऱ्या दिवशी भेटायला, या असे सांगितले होते.
कुमारस्वामींविरोधात
आज गौप्यस्फोट करणार
येदियुरप्पा म्हणाले की, आमदारकीच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री कुमारस्वामींनी २५ कोटी रुपये मागितल्याचा पुरावा माझ्याकडे असून, तो सोमवारी मी सभागृहात उघड करणार आहे.
तसेच कुमारस्वामींवर कारवाई करण्याची मागणीही विधानसभा अध्यक्षांकडे केली जाईल. माझ्या विरोधात उघड केलेल्या ध्वनिफीत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. त्यामुळे नेमके सत्य बाहेर
येईल.
भाजपाची ३० कोटींची आॅफर - जेडीएस आमदार
आमदारकीचा राजीनामा देऊन जनता दल (सेक्युलर) मधून बाहेर पडण्यासाठी मला भाजपने ३० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. त्यातील पाच कोटींचा पहिला हप्ता आपण स्वीकारलाही होता, असे आमदार के. श्रीनिवास गौडा यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले की, मी पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे माझ्याकडे आलेल्या तीन भाजपा नेत्यांना सांगितले होते. हा सारा प्रकार मी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या कानावर घातला. भाजपा नेत्यांशी संपर्क साधून त्यांना पाच कोटी रुपये परत घेऊन जाण्यास सांगितले.