खोटे संदेश रोखण्यासाठी व्हॉटस्अॅपवर दबाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 02:21 AM2018-08-22T02:21:54+5:302018-08-22T02:22:26+5:30
अन्यथा कारवाई करू; रविशंकर प्रसाद यांची कंपनीच्या सीईओला तंबी
नवी दिल्ली : व्हॉटस्अॅपने भारतात तक्रार निवारण केंद्र स्थापन करावे, तसेच खोट्या संदेशांचा माग काढणारी व्यवस्था निर्माण करावी, अशी सूचना भारत सरकारने व्हॉटस्अॅपचे सीईओ ख्रिस डॅनियल यांना केली आहे.
व्हॉटस्अॅप सीईओ ख्रिस डॅनियल यांनी मंगळवारी केंद्रीय आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसाद यांनी ही माहिती दिली. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, व्हॉटस्अॅपने भारताच्या विविध क्षेत्रात तंत्रज्ञानविषयक योगदान दिले आहे, त्याबद्दल मी डॅनियल यांच्याकडे व्हॉटस्अॅपची प्रशंसाच केली आहे. तथापि, काही अत्यंत घातक घटनाही व्हॉटस्अॅपमुळे घडत आहे. जमावाकडून होणाऱ्या हत्यांना उत्तेजन देणारे संदेश व्हॉटस्अॅपवरून फिरतात. सूडभावनेतून अश्लील फिती प्रसारित केल्या जात आहेत. हे प्रकार भारतीय कायद्याचे उल्लंघन करणारे आहेत. यावर काही तरी उपाय करणे आवश्यक आहे. प्रसाद यांनी सांगितले की, खोटे संदेश हजारो-लाखोंच्या संख्येने प्रसारित होत असतात. त्यावर उपाय शोधला गेला नाही, तर व्हॉटस्अॅपवर गुन्ह्याला प्रोत्साहित केल्याची कलमे लावली जातील. आपल्या सूचनांवर काम करण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे.
तक्रारी अमेरिकेतून नव्हे; भारतातून हाताळा
प्रसाद यांनी सांगितले की, आपण कंपनीकडे काही मुख्य मागण्या केल्या आहेत. त्यात व्हॉटस्अॅपचे भारतात तक्रार निवारण कार्यालय असायला हवे, भारतीय कायद्यांचे योग्य पालन केले जावे आणि भारतातील प्रश्नाचे अमेरिकेतून उत्तर देण्याची पद्धत बंद केली जावी यासोबत व्हॉटस्अॅप ही आता भारतातील एक प्रमुख डिजिटल साठवणूक व्यवस्था बनली असल्याने कंपनीची भारतात योग्य औद्योगिक आस्थापना (कॉर्पोरेट एन्टायटी) असली पाहिजे आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे.