सामान्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या फोक्सवॅगनने मागितली माफी
By Admin | Published: February 4, 2016 03:14 AM2016-02-04T03:14:10+5:302016-02-04T03:14:10+5:30
मर्यादेपेक्षा ४० पट अधिक प्रदूषण करत ग्राहकांच्या जिवाशी खेळणाऱ्या फोक्सवॅगन या वाहननिर्मिती करणाऱ्या जर्मन कंपनीने बुधवारी आॅटोएक्स्पो दरम्यान भारतीय ग्राहकांची माफी मागितली.
नवी दिल्ली : मर्यादेपेक्षा ४० पट अधिक प्रदूषण करत ग्राहकांच्या जिवाशी खेळणाऱ्या फोक्सवॅगन या वाहननिर्मिती करणाऱ्या जर्मन कंपनीने बुधवारी आॅटोएक्स्पो दरम्यान भारतीय ग्राहकांची माफी मागितली. येथे सुरू असलेल्या आॅटोएक्स्पोदरम्यान कंपनीने आपले नवीन मॉडेल सादर केले. त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही माफी मागितली.
कंपनीच्या विक्री व वितरण विभागाचे मुख्याधिकारी जर्गन स्टॅक्समन यांनी सांगितले की, कंपनीच्या हातून काही गंभीर चुका झाल्या आहेत. याबद्दल आम्ही ग्राहकांची सपशेल माफी मागतो. योग्य गोष्ट करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून यापुढे योग्यतेचीच कास धरली जाईल असेही ते म्हणाले. प्रत्येक देशातील प्रदूषणाचे जे नियम आहेत त्याचा पुरेपूर अभ्यास करून त्यानुसार त्या सर्व निकषांचे पालन करून वाहननिर्मिती करण्याची हमी त्यांनी दिली. फोक्सवॅगन या कंपनीने काही विशिष्ट गाड्यांत बसविलेल्या इंजिनमुळे प्रदूषणाच्या मात्रेत तब्बल ४० पट वाढ झाली आहे. या इंजिनमुळे गाडीचा परफॉर्मन्स जरी वाढला असला तरी, प्रदूषणात वाढ झाली आणि मुख्य म्हणजे, कंपनीने सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रदूषणाची ही मात्रा दडविण्याचा प्रकार केला. अमेरिकेतील पर्यावरण एजन्सीने हा बनाव उजेडात आणला आणि त्यानंतर कंपनीवर घसघशीत दंडाची कारवाई केली. कंपनीनेही अमेरिका, युरोप आणि अन्य काही देशांतून आपली मॉडेल्स माघारी बोलावली आहेत. भारतातही कंपनीने आपल्या गाड्या माघारी बोलावल्या आहेत.