बेरोजगारी हटाव यात्रेसाठी तेजस्वी यादवांची हायटेक बस सज्ज; विरोधकांनी साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 11:00 AM2020-02-15T11:00:19+5:302020-02-15T11:07:42+5:30
तेजस्वी यांच्या यात्रेवर विरोधकांनी टीका केली आहे. कोट्यवधी रुपयांच्या हायटेक बसमधून लालू यांच्या मुलाची यात्रा होणार आहे. या यात्रेला बेरोजगारी हटाव यात्रा न म्हणता लग्झरी यात्रा म्हणावी लागेल, अशी टीका विरोधकांनी केली आहे.
नवी दिल्ली - राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहार विधानसभेतील विरोधीपक्षनेते तेजस्वी यादव बेरोजगार युवकांच्या नोकऱ्यांच्या मागणीसाठी राज्यभर यात्रा काढणार आहे. ते यात्रेवर कधी निघणार हे निश्चित नाही. मात्र त्यांच्या यात्रेसाठी खास बस तयार करण्यात आली आहे. त्यावरून त्यांच्या विरोधकांनी टीका केली आहे.
तेजस्वी यादव यांच्यासाठी तयार कऱण्यात आलेली बस गडद हिरव्या रंगाची आहे. यावर मोठ्या शब्दात बेरोजगारी हटाव यात्रा असं लिहिण्यात आले आहे. तसेच या बसला युवा क्रांती बस नाव देण्यात आलेले आहे. तसेच समोरच्या बाजुने 'नया बिहार' असं नमूद कऱण्यात आले आहे.
बसवर एका बाजुला सिंचन, उत्पन्न, आरोग्य, शिक्षण आणि नोकरी असं लिहिण्यात आले आहे. तसेच राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्यासह तेजस्वी यादव यांचा फोटो आहे. याच वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीवर तेजस्वी यांची नजर असून राष्ट्रीय जनता दलाचा राज्यातील जनाधार वाढविण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
तेजस्वी यांच्या यात्रेवर विरोधकांनी टीका केली आहे. कोट्यवधी रुपयांच्या हायटेक बसमधून लालू यांच्या मुलाची यात्रा होणार आहे. या यात्रेला बेरोजगारी हटाव यात्रा न म्हणता लग्झरी यात्रा म्हणावी लागेल, अशी टीका विरोधकांनी केली आहे.