उत्तराखंडच्या खर्चावर वटहुकूम
By admin | Published: April 2, 2016 02:09 AM2016-04-02T02:09:26+5:302016-04-02T02:09:26+5:30
राष्ट्रपती राजवटीखाली असलेल्या उत्तराखंडमधील खर्चाला परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी वटहुकूम जारी केला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी उत्तराखंड विनियोग
नवी दिल्ली : राष्ट्रपती राजवटीखाली असलेल्या उत्तराखंडमधील खर्चाला परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी वटहुकूम जारी केला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी उत्तराखंड विनियोग (लेखानुदान) वटहुकूम २०१६ जारी केला आहे, असे एका सरकारी अधिसूचनेत म्हटले आहे. या वटहुकूमाचा उद्देश २०१६-१७ या वित्त वर्षाच्या एका भागासाठी सेवांकरिता उत्तराखंड राज्याच्या एकत्रित निधीमधून काही रक्कम काढण्याची व्यवस्था करणे हा आहे, असे या अधिसूचनेत म्हटले आहे.
‘संसदेचे अधिवेशन सुरू नाही, त्यामुळे हा वटहुकूम जारी करण्यात येत आहे. उत्तराखंड राज्याच्या वित्तीय कामकाजाच्या संचालनासाठी तत्काळ पाऊल उचलण्याच्या उद्देशाने हा वटहुकूम जारी करणे आवश्यक आहे, याबाबत राष्ट्रपतींचेही समाधान झालेले आहे,’ असे या अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.
राज्यात चालू वित्त वर्षासाठी काही सेवांवर होणारा खर्च भागविण्याच्या उद्देशाने १३,६४२.४३ कोटी रुपये काढण्याची अनुमती या वटहुकूमाद्वारे देण्यात आली आहे. ं(लोकमत न्यूज नेटवर्क)
उत्तराखंडवर केंद्र सरकारने जारी केलेला वटहुकूम घटनाबाह्य आहे. विधानसभेने १८ मार्च रोजीच विनियोग विधेयक पारीत केले होते आणि अध्यक्षांनी घोषणाही केली होती, असे काँग्रेसने म्हटले आहे.
एक राज्य विधानसभेने संमत केलेला आणि दुसरा केंद्र सरकारतर्फे वटहुकूम जारी करून आणलेला असे दोन अर्थसंकल्प असू शकतात काय? विधानसभेतील कार्यवाही केंद्र कशी काय बदलू शकतो? ही कृती घटनाबाह्य आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी म्हणाले.