'माझ्या बायकोला मतदान करा, नाहीतर....', भरसभेत भाजपा नेत्यांची मुस्लिमांना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 04:55 PM2017-11-17T16:55:57+5:302017-11-17T17:02:29+5:30
आपल्या पत्नीला मतदान केलं नाही, तर तुम्हाला खूप कष्ट भोगावे लागतील अशी धमकीच भाजपा नेत्याने दिली असून, हे सर्व कॅमे-यात कैद झालं आहे.
लखनऊ - उत्तर प्रदेशात भाजपा नेत्याने भरसभेत मुस्लिम मतदारांना धमकावल्याचं प्रकरण समोर आलं आहे. आपल्या पत्नीला मतदान केलं नाही, तर तुम्हाला खूप कष्ट भोगावे लागतील अशी धमकीच भाजपा नेत्याने दिली असून, हे सर्व कॅमे-यात कैद झालं आहे. रणजीत कुमार श्रीवास्तव असं या भाजपा नेत्याचं नाव असून ते नगरसेवक आहेत. त्यांची पत्नी शशी श्रीवास्तव महापालिका निवडणूक लढत असून, त्यानिमित्ताने आयोजित प्रचारसभेत बोलताना रणजीत कुमार यांनी थेट धमकीच देऊन टाकली. रणजीत कुमार जेव्हा बोलत होते तेव्हा योगी सरकारमधील दोन राज्यमंत्रीही स्टेजवर उपस्थित होते. धमकीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
भाजपा नगरसेवक रणजीत कुमार श्रीवास्तव यांची पत्नी शशी श्रीवास्ताव बाराबंकी येथून महापालिका निवडणूक लढत आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान बोलताना रणजीत कुमार यांनी मतदारांना धमकावत आपल्याच पत्नीला मतदान करायला सांगितलं. यावेळी योगी आदित्यनाथ सरकारमधील दोन नेते दारा सिंह चौहान आणि रामपंती शास्त्री उपस्थित होते.
'हे समाजवादी पक्षाचं सरकार नाही. इथे तुमचा कोणताच नेता तुम्हाला मदत करु शकत नाही. रस्ते, निचरा ही महापालिकेची कामे आहेत. तुम्हाला कदाचित इतर समस्याही जाणवतील. भाजपाचा पराभव करु शकेल असा एकही उमेदवार सध्या नाहीये. जर तुम्ही आमच्या उमेदवाराला जिंकण्यात मदत केली नाही, जर तुम्ही शशी श्रीवास्ताव यांना मतदान केलं नाही तर जे अंतर तुम्ही निर्माण कराल त्यामधून समाजवादी पक्षही वाचवू शकणार नाही. भाजपा सत्तेत आहे. ज्या समस्या तुम्हाला आधी कधीच भोगाव्या लागल्या नाहीत,त्या सर्व भोगाव्या लागतील', असं रणजीत कुमार यावेळी बोलले.
'म्हणूनच मी मुस्लिमांना सांगत आहे की, आम्हाला मतदान करा. मी भीक मागत नाहीये. जर मत दिलंत तर सुखाने राहाल, अन्यथा काय समस्या निर्माण होतील याची तुम्हाला जाणीव नाही', अशी धमकी रणजीत कुमार यांनी दिली आहे.