गुजरातमध्ये 'व्हॅलेंटाईन डे'ची अनोखी शपथ, 'आई-वडिलांच्या परवानगीशिवाय लग्न नको'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 02:09 PM2019-02-14T14:09:54+5:302019-02-14T15:39:07+5:30
सुरतमधील लाफ्टर क्लब आणि क्राईंग क्लबचे संस्थापक आणि लाफ्टर थेरेपीस्ट कमलेश मसालावाला यांनी ही संकल्पना सर्वप्रथम मांडली.
अहमदाबाद - गुजरातच्या सुरतमधील एका लाफ्टर क्लब चालकाच्या संकल्पनेतून 10 हजार शालेय विद्यार्थ्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अनोखी शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे या शपथेचे सोशल मीडियावर कौतुकही होत आहे. आई-वडिलांच्या परवानगीशिवाय लग्न करणार नाही, अशी शपथ येथील विविध शाळेतील 10 हजार विद्यार्थ्यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे व्हॅलेंटाईन डेचे निमित्त साधत ही शपथ घेण्यात आली आहे.
सुरतमधील लाफ्टर क्लब आणि क्राईंग क्लबचे संस्थापक आणि लाफ्टर थेरेपीस्ट कमलेश मसालावाला यांनी ही संकल्पना सर्वप्रथम मांडली. त्यानंतर, या संकल्पनेला मिळालेल्या प्रतिसादानंतर तब्बल 10 हजार शालेय विद्यार्थ्यांनी ही शपथ घेतली. सुरतमध्ये मसालावाला यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत. मी प्रेम किंवा प्रेमविवाहाच्या विरोधात नाही. मात्र, प्रत्येकाच्या जीवनातील त्यांच्या आई-वडिलांचे योगदान कुणीही विसरता कामा नये. आई-वडिलांनीही मुलांच्या भविष्याबाबत अनेक स्वप्ने पाहिलेली असतात. त्यामुळे मुलांनी आपल्या अपेक्षेने लग्न करावे, ही त्यांची इच्छा असते.
माझ्याकडे अनेक मुले त्यांच्या लग्नासंदर्भातील समस्या घेऊन येतात. कारण, त्यांच्या प्रेमाला, प्रेमविवाहाला कुटुंबातून विरोध असतो. मात्र, कुटुंबीयांना समजावून सांगितल्यास, त्यांचा विरोध कमी होऊन ते तुमच्या लग्नला परवानगी देतील, असे मला वाटते. माझ्याकडे येणाऱ्या मुलांच्या या समस्यांमधूनच मला ही संकल्पना सुचल्याचे मसालावाला यांनी सांगितले. त्यानंतर, मी हरातील शिक्षण संस्थाचालकांशी संपर्क केला असून, त्यापैकी जवळपास 20 शाळांनी आमच्या या संकल्पनेत सहभाग होण्यास प्रतिसाद दिला. त्यानुसार, आम्ही या शपथ कार्यक्रमाची तयारी केली.
दरम्यान, शहरातील बाल मनोरोगतज्ञ डॉ. मुकूल चोक्सी यांनी लिहिलेल्या कवितेद्वारे शालेय विद्यार्थ्यांना ही शपथ देण्यात आली. मुकूल चोक्सी हे स्वत: कवी आहेत.