मतदान ओळखपत्र : 17 वर्षांच्या तरुणांना ‘ॲडव्हान्स बुकिंग’ची सोय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 08:45 AM2022-07-29T08:45:52+5:302022-07-29T08:46:10+5:30
निवडणुकीत सहभाग वाढविण्यासाठी आयोगाचा निर्णय; वर्षातून तीन वेळा मिळणार संधी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आता मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी तरुणांना वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागणार नाही. १७ वर्षे पूर्ण होताच तरुणांना मतदार ओळखपत्रासाठी आगाऊ अर्ज करता येईल.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांनी सर्व राज्यांतील संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. निवडणुकीत युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे देशात तरुण मतदारांची संख्या वाढणार आहे.
वर्षातून चार वेळा नोंदणी
निवडणूक कायद्यात बदल केल्यानंतर आता १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर असे चार वेळा मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. यामुळे १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांना मत देण्यासाठी अधिक वाट पाहावी लागणार नाही.
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अगदी अलीकडेपर्यंत एक जानेवारी रोजी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण झालेले लोक पात्र होते.
एक जानेवारीनंतर १८ वर्षांचे होणाऱ्यांना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी पूर्ण एक वर्षे वाट पाहावी लागत होती.
अपंगांना फायदा
nअपंगांना घरी बसून अपंगत्व प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
nमतदान यादीमुळे नावासमोर अपंग शब्द लिहिण्यासाठी फॉर्म क्रमांक ८ भरता येईल. हे ऐच्छिक आहे.
nअपंग मतदारांचा डेटा बूथ स्तरावर उपलब्ध होणार आहे.
nअपंगांना मतदानासाठी केंद्रावर यामुळे त्रास होणार नाही.
मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याची तयारी
निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी १ ऑगस्ट २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. याची सुरुवात महाराष्ट्रातून करण्यात येणार आहे. यात मतदार यादीत सहभाग असलेले प्रत्येक नाव आधार क्रमांक घेऊन लिंक केले जाणार आहे. यामुळे डुप्लिकेट नावे राहणार नाहीत. ज्या मतदारांकडे आधार क्रमांक नाही त्यांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे.