मतदारांची नाराजी भोवणार; भाजपा एक तृतीयांश खासदारांचे तिकीट कापणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 05:20 PM2019-04-06T17:20:20+5:302019-04-06T17:36:08+5:30
सलग दुसऱ्यांदा दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या सभा आणि अमित शहांची रणनीती दिमतील असूनही भाजपाला मतदारांच्या नाराजीची भीती वाटत आहे.
नवी दिल्ली - सलग दुसऱ्यांदा दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या सभा आणि अमित शहांची रणनीती दिमतील असूनही भाजपाला मतदारांच्या नाराजीची भीती वाटत आहे. त्यामुळे स्थानिक मुद्द्यांमुळे असलेली मतदारांची नाराजी आणि सत्ताविरोधी लाटेचा प्रभाव टाळण्यासाठी भाजपाने अनेक खासदारांना पुन्हा उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादींचा आढावा घेतल्यास 2014 मध्ये जिंकून आलेल्या खासदारांपैकी सुमारे 71 खासदारांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिलेली नाही. तसेच अन्य 26 जागांवरील उमेदवारांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा देशभरातील एकूण 400 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडणार आहे. 2014 मध्ये निवडून आलेल्या पण आता उमेदवारी नाकारण्यात आलेल्या खासदारांऐवजी ज्यांना उमेदवारी मिळाली आहे ते उमेदवार पक्षाला 2014 प्रमाणेच यश मिळवून देऊ शकतील की नाही हा प्रश्नच आहे.
10 वर्षांहून अधिक काळ सत्तेवर असणाऱ्या पक्षाला सत्ताविरोधी वातावरणाचा फटका बसत असतो. 2014 मध्ये काँग्रेसलाही या सत्ताविरोधी लाटेचा जबरदस्त धक्का बसला होता. मात्र मोदींना सत्तेत येऊन आता केवळ 5 वर्षेच झाली आहेत. मात्र ज्या राज्यांत भाजपा दीर्घाकाळापासून सत्तेत आहेत तिथे पक्षाला त्याचा फटका बसू शकतो.
ज्या ठिकाणी विद्यमान खासदारांना तिकीट नाकारण्यात आले आहे. त्याशिवाय इतर ठिकाणीही सत्ताविरोधी लाटेचा फटका बसू शकतो. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनाधार आणि भक्कम संघटनात्मक बांधणी याच्या जोरावर ही नाराजी थोपवता येईल, असा अमित शहा यांना विश्वास आहे. ज्या खारदारांची कामगिरी समाधानकारक नसतानाही त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे, अशा ठिकाणी मोदींचा चेहरा पुढे करून भाजपाकडून निवडणूक लढवली जाईल, अशी शक्यता आहे.
दरम्यान, भाजपाला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळेल. देशात सत्ताविरोधी नव्हे तर सत्तेच्या बाजूने वातावरण आहे, अशा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता.