मतदार चार दिवस सुटीवर

By admin | Published: September 24, 2014 02:57 AM2014-09-24T02:57:14+5:302014-09-24T02:57:14+5:30

तिकीटवाटपाचा घोळ अद्याप सुटला नसला तरीही प्रत्येक राजकीय पक्षाने कार्यकर्त्यांना प्रचारासाठी तयार राहण्यास सांगितले आहे.

Voters on a four-day holiday | मतदार चार दिवस सुटीवर

मतदार चार दिवस सुटीवर

Next

सुशांत मोरे, मुंबई
तिकीटवाटपाचा घोळ अद्याप सुटला नसला तरीही प्रत्येक राजकीय पक्षाने कार्यकर्त्यांना प्रचारासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. मात्र पुढील महिन्यातील पहिल्याच आठवड्यात येणाऱ्या सलग सुट्यांमुळे प्रचारफेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सलग सुट्यांमुळे मतदारराजा मौजमजा करण्यासाठी पर्यटनस्थळी जाणार आहे. त्यात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असणार आहे. त्यामुळे प्रचार नेमका कुणासाठी आणि कसा करायचा, असा प्रश्न राजकीय पक्षांना पडेल. या चार दिवसांत कार्यकर्तेही कमी पडण्याची धास्ती राजकीय पक्षांना आहे.
महायुती आणि आघाडीसह अन्य राजकीय पक्षांचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. १५ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असून उमेदवारांना प्रचारासाठी खूपच कमी दिवस मिळत आहेत. कार्यकर्त्यांची मात्र यात बरीच धावपळ होणार आहे. प्रचारासाठी खूपच कमी असलेला कालावधी आणि आपला नक्की उमेदवार कोण, हे माहिती नसलेल्या कार्यकर्त्यांचा प्रचारात बराच कस लागणार आहे. असे असतानाच त्यांच्यासमोर आणखी एक समस्या उद्भवली आहे.
आॅक्टोबर महिन्यात सलग सुट्या येत असल्याने प्रचाराचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. २ आॅक्टोबर महात्मा गांधी जयंती, ३ आॅक्टोबरला दसरा आणि ५ आॅक्टोबरला बकरी ईद आहे. या दरम्यान ४ आॅक्टोबरला शनिवार येत असल्याने अनेक जण चार दिवसांच्या सुट्यांचे नियोजन आखण्यात गुंतले आहेत. त्यामुळे बाहेरगावी जात असलेल्या मतदारांपर्यंत या चार दिवसांत पोहोचायचे कसे, असा प्रश्न राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पडला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बाहेरगावी जाणाऱ्यांमध्ये आपले कार्यकर्ते तर नाहीत ना, असा प्रश्नदेखील पदाधिकाऱ्यांनाच पडला असून कार्यकर्ते कुठेही कमी पडता कामा नयेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार प्रचारयंत्रणेची आखणी केली जात आहे.

Web Title: Voters on a four-day holiday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.