विधानसभेसाठी मतदान : यूपीत आज पहिला टप्पा
By admin | Published: February 11, 2017 01:13 AM2017-02-11T01:13:29+5:302017-02-11T01:14:42+5:30
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शनिवारी होत आहे. १५ जिल्ह्यातील ७३ मतदारसंघात विविध राजकीय पक्षांची प्रतिष्ठा आज पणाला लागणार आहे
लखनौ : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शनिवारी होत आहे. १५ जिल्ह्यातील ७३ मतदारसंघात विविध राजकीय पक्षांची प्रतिष्ठा आज पणाला लागणार आहे. राज्यात ११ फेब्रुवारी ते ८ मार्च या काळात सात टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, मतदानाच्या पार्श्वभूमीवर सहा हजार निमलष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळपास तीन वर्षांच्या कार्यकाळाची ही परीक्षा समजली जात आहे.
पश्चिमांचलच्या मुस्लिमबहुल भागात मतदान होत आहे. यात प्रामुख्याने शामली, मुजफ्फरनगर, बागपत, मेरठ, गाजियाबाद, गौतमबुद्धनगर, हापुड, बुलंदशहर, अलीगढ, मथुरा, हाथरस, आग्रा, फिरोजाबाद, एटा आणि कासगंज जिल्ह्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील या मतदानात १ कोटी १७ लाख महिलांसह एकूण २ कोटी ६० लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ८३९ उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला होणार असून मतदानासाठी २६,८२३ केंद्र असणार आहेत.
पहिल्या टप्प्यातील मतदानात जे प्रमुख उमेदवार आहेत त्यात नोएडामधून केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांचे चिरंजीव पंकज सिंह, भाजपचे संसद सदस्य हुकुम सिंह यांची मुलगी मृगांका कैराना मतदारसंघातून तर, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीकांत शर्मा आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते प्रदीप माथुर हे मथुरा येथून निवडणूक लढवित आहेत. भाजपचे वादग्रस्त आमदार संगीत सोम आणि सुरेश राणा अनुक्रमे सरधना आणि थाना भवन येथून नशिब आजमावत आहेत. बागपत हा राष्ट्रीय लोक दलाचा बालेकिल्ला मानला जातो.
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत बाजपेयी मेरठमधून, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे जावई राहुल सिंह हे सपाच्या तिकीटावर सिंकंदराबादहून निवडणूक लढत आहेत. राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांचे नातू संदीप सिंह हे अतरौली येथून निवडणूक लढत आहेत. ज्या भागांत २०१३ मध्ये दंगल झाली होती, त्या मुजफ्फरनगर आणि शामली जिल्ह्यांतही मतदान होत आहे. तेथील अनेक मतदारसंघ संवेदनशील ठरवण्यात आले असून, तिथे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.