निझामाबादमध्ये 26 हजार 'ईव्हीएम'द्वारे मतदान, गिनीज रेकॉर्ड होऊ शकतो
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 02:16 PM2019-04-11T14:16:42+5:302019-04-11T14:44:46+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 91 जागांसाठी आज मतदान होत आहे.
निझामाबाद : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 91 जागांसाठी आज मतदान होत आहे. या पहिल्या टप्प्यात तेलंगणातील निझामाबाद मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, निझामाबाद मतदार संघात तेलंगणा राष्ट्रसमिती अर्थात टीआरएसचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता यांच्याविरोधात 178 शेतकरी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
निझामाबाद मतदारसंघात एकूण 185 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे उमेदवारांची संख्या पाहता याठिकाणी निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी 26 हजार ईव्हीएमचा वापर होत आहे. त्यामुळे पहिल्यांदाच इतक्या जास्त ईव्हीएमचा वापर होत असल्यामुळे गिनीज बुकात रेकॉर्ड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक मतदार केंद्रावर एक कंट्रोल युनिट, 12 बॅलेट युनिट आणि एक व्हीव्हीपॅट मशीन लावण्यात आली आहे. दरम्यान, याआधी 1996 साली तेलंगणमधीलच नालगोंडा मतदार संघात तब्बल 480 उमेदवार रिंगणात होते, त्यावेळी बॅलट पेपरद्वारे मतदान घेण्यात आले होते.
तेलंगणातील मुख्य निवडणूक आयुक्त रजत कुमार म्हणाले, "निझामाबाद मतदारसंघासाठी सर्वात जास्त ईव्हीएम वापरण्यात आली आहेत, असे आम्ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींना पत्र लिहिले आहे. गिनीजची टीम लवकरच निझामाबादचा दौरा करेल. साधारणता एका कंट्रोल युनिटपासून 4 बॅलेटिंग युनिट जोडली असतात. मात्र निझामाबादमध्ये 12 बॅलेटिंग युनिट प्रत्येक कंट्रोलिंग युनिटला जोडली आहेत."
दरम्यान, सुरुवातीला निझामाबादमध्ये बॅलेट पेपरने मतदान होणार असे जाहीर करण्यात आले होते. यासाठी निझामाबाद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आयोगाने तातडीने दहा लाख मतपत्रिका छापण्याची ऑर्डर दिली होती. परंतु आता हा निर्णय मागे घेत येथे ईव्हीएमद्वारेच निवडणूक होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
Telangana: Telangana Rashtra Samithi's Kalvakuntla Kavitha after casting her vote at a polling station in Pothangal, in Nizamabad parliamentary constituency earlier today pic.twitter.com/kWBNeUybo4
— ANI (@ANI) April 11, 2019