राष्ट्रपतिपदासाठी आज मतदान; द्रौपदी मुर्मू-यशवंत सिन्हा आमने-सामने, २१ जुलैला मतमोजणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 05:30 AM2022-07-18T05:30:32+5:302022-07-18T05:31:39+5:30

देशातील सुमारे ४८०० आमदार, खासदार राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत.

voting today for presidential election 2022 draupadi murmu and yashwant sinha candidature counting on july 21 | राष्ट्रपतिपदासाठी आज मतदान; द्रौपदी मुर्मू-यशवंत सिन्हा आमने-सामने, २१ जुलैला मतमोजणी

राष्ट्रपतिपदासाठी आज मतदान; द्रौपदी मुर्मू-यशवंत सिन्हा आमने-सामने, २१ जुलैला मतमोजणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : देशातील सुमारे ४८०० आमदार, खासदार सोमवारी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. त्याद्वारे १५ व्या राष्ट्रपतीची निवड केली जाईल. या निवडणुकीत एनडीएतर्फे द्रौपदी मुर्मू व विरोधी पक्षांतर्फे माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा हे रिंगणात आहेत. एकूण मतांपैकी ६० टक्क्यांहून अधिक मते मिळून द्रौपदी मुर्मू विजयी होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी संसद भवन, राज्यांतील विधानसभांच्या दालनांमध्ये उद्या, सोमवारी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी २१ जुलै रोजी संसद भवनामध्ये केली जाईल. तसेच नवे राष्ट्रपती २५ जुलै रोजी आपल्या पदाची शपथ घेतील.

प्रादेशिक पक्षांचा द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा

- प्रादेशिक पक्षांनी मुर्मू यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएकडे आता ६.६७ लाख मते आहेत. 

- मुर्मू यांना बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, अण्णाद्रमुक, बहुजन समाज पक्ष, तेलुगू देसम पक्ष, जनता दल (सेक्युलर), शिरोमणी अकाली दल, शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा आदी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांना दोन तृतीयांश मते मिळण्याची शक्यता आहे.

शिंदे-फडणवीसांचा आज धक्का कोणाला?

द्रौपदी मुर्मू यांना आमदारांची दोनशे मते मिळवून देण्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या  जोडीला राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीत चमत्कार करणारे देवेंद्र फडणवीस आहेत. उद्याच्या निवडणुकीत विरोधकांची मते फुटतील का या बाबत कमालीची उत्सुकता आहे. 

उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षांकडून मार्गारेट अल्वा

मार्गारेट अल्वा या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांनी गोव्याच्या १७ व्या राज्यपाल, गुजरातच्या २३व्या राज्यपाल, राजस्थानच्या २०व्या तर उत्तराखंडच्या चौथ्या राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे. त्या माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेस पक्षाच्या माजी सरचिटणीस आहेत. मार्गारेट अल्वा (८० वर्षे) या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांच्या उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी १७ विरोधी पक्षांच्या रविवारी झालेल्या बैठकीत अल्वा यांच्या उमेदवारीबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला. याआधी भाजपप्रणीत एनडीएने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांची उमेदवारी या निवडणुकीसाठी निश्चित केली आहे.

निवडणूक होणार ६ ऑगस्टला 

उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक येत्या ६ ऑगस्टला आहे. मार्गारेट अल्वा मंगळवारी, १९ जुलै रोजी उमेदवारी अर्ज भरतील. तृणमूल व आम आदमी पार्टी यांनी अल्वा यांना पाठिंबा द्यावा म्हणून प्रयत्न आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाही सोबत असणार आहे, असेही पवार म्हणाले.
 

Web Title: voting today for presidential election 2022 draupadi murmu and yashwant sinha candidature counting on july 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.