उत्तर प्रदेशमध्ये अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान; दोन काेटी मतदार बजावणार हक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 06:46 AM2022-03-07T06:46:32+5:302022-03-07T06:46:39+5:30
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले आहेत. त्यात एकूण ३४९ जागांसाठी मतदान झाले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या विधानसभेसाठी अखेरच्या टप्प्यातील मतदान साेमवारी हाेणार आहे. शेतकरी आंदाेलन, बेराेजगारी, लखीमपर खेरी प्रकरण आदी मुद्दे निवडणुकीत प्रचाराच्या केंद्रस्थानी हाेते.
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले आहेत. त्यात एकूण ३४९ जागांसाठी मतदान झाले आहे. अखेरच्या टप्प्यात वाराणसी, चंदाैली, भदाेही, मिर्जापूर, राॅबर्ट्सगंज, आजमगड, मउ, जाैनपूर आणि गाजीपूर या जिल्ह्यांमध्ये मतदान हाेणार आहे.
निवडणुकीत शेतकरी आंदाेलन, लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांना मृत्यू, महागाई, बेराेजगारी, आदी मुद्द्यांवर विराेधकांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले तर भाजपने सपा सरकारच्या काळातील कथित गुंडाराज, माफियाराज, मुजफ्फरनगर दंगल आदींवर प्रचार केला. अखेरीस पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सपाचे नेते अखिलेश यादव यांच्यासाेबत प्रचार केला.
६१३ उमेदवार रिंगणात
सातव्या टप्प्यात दाेन काेटींहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ५४ जागांसाठी एकूण ६१३ उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये ७५ महिला उमेदवारांचाही समावेश आहे.
नेते वाराणसीत मुक्कामी
अंतिम टप्प्यात अनेक नेते वाराणसी येथे काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले. अनेक नेते गेल्या काही दिवसांपासून वाराणसीमध्येच मुक्कामी आहेत.