उपराष्ट्रपतिपद निवडणूकीसाठी आज मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 06:10 AM2022-08-06T06:10:34+5:302022-08-06T06:11:06+5:30
मार्गारेट अल्वा यांच्या उमेदवारीबद्दल विरोधी पक्षांमध्ये मतैक्य नव्हते. जगदीप धनकड यांचा विजय निश्चित असल्याचे सांगण्यात येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उद्या, शनिवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड व विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात लढत होईल. पाठिंबा देणाऱ्यांच्या संख्याबळाचा विचार केला, तर जगदीप धनकड यांचा विजय निश्चित असल्याचे सांगण्यात येते.
मार्गारेट अल्वा यांच्या उमेदवारीबद्दल विरोधी पक्षांमध्ये मतैक्य नव्हते. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांतर्फे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा (वय ८०) यांना उमेदवारी देताना सर्वांशी नीट चर्चा केली नव्हती, असा आक्षेप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतला होता. त्यामुळे मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय तृणमूूल काँग्रेसने घेतला आहे. तर टीआरएसने अल्वा यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा राजस्थानच्या माजी राज्यपाल, तर एनडीएचे उमेदवार व भाजप नेते जगदीश धनकड (वय ७१) पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आहेत. धनकड हे राजस्थानातील जाट समुदायाचे नेते आहेत. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उद्या शनिवारी, सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत संसद भवनात मतदान होणार आहे. त्यानंतर लगेचच मतमोजणीला प्रारंभ होईल. शनिवारी रात्रीपर्यंत विजेत्या उमेदवाराचे नाव जाहीर करतील.
जगदीप धनकड आणि मार्गारेट अल्वा रिंगणात
गुप्त मतदानाद्वारे निवड
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत संसदेच्या लोकसभा, राज्यसभा या दोन सभागृहांतील ७८८ सदस्य मतदान करतात. सर्व मतदार संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य असल्याने त्या खासदारांच्या मताचे मूल्य प्रत्येकी एक इतके असून, ते मत हस्तांतरणीय नसते, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली. या निवडणुकीत गुप्त मतदानपद्धती अवलंबिली जाते.
फक्त संसद भवनातच होणार मतदान
nउपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत खुली मतदानपद्धती नसते. तसेच राष्ट्रपती, उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकांत राजकीय पक्ष आपल्या खासदारांसाठी व्हीप जारी करू शकत नाहीत.
nराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी संसद भवन व विविध राज्यांतील विधानसभांच्या विशिष्ट दालनांमध्ये मतदानाची सुविधा उपलब्ध केली जाते. मात्र उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी फक्त संसद भवनाच्या दालनामध्येच मतदान होणार आहे.