झारखंडमध्ये आज मतदान, १० राज्यांत होणार पोटनिवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 07:15 AM2024-11-13T07:15:31+5:302024-11-13T07:15:45+5:30
३१ विधानसभांसह वायनाड लोकसभा मतदारसंघातही लागणार बाेटाला शाई.
लोकमत न्यूज नेटवर्क, रांची/नवी दिल्ली : झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात ४३ जागांसाठी उद्या बुधवारी (दि.१३) निवडणुका होणार आहेत तसेच १० राज्यांत ३१ विधानसभा जागांसह केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात बुधवारी पोटनिवडणुका होतील. वायनाडमध्ये काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी निवडणूक रिंगणात आहेत.
सिक्कीममधील विधानसभेच्या २ जागांवर ३० ऑक्टोबरला सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाच्या (एसकेएम) दोन उमेदवारांची बिनविरोध झाली आहे. यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकांत केरळमधील वायनाड व उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोन्ही मतदारसंघांतून राहुल गांधी विजयी झाले होते. त्यातील वायनाड मतदारसंघ त्यांनी सोडला.
आमदार, खासदार झाल्याने पोटनिवडणुका
१० राज्यांतील ३१ विधानसभा जागांपैकी २८ जागांवरील आमदार लोकसभा निवडणुकीत लढून विजयी ठरले होते. त्याशिवाय दोन मतदारसंघांतील आमदारांचे निधन झाले. एका आमदाराने पक्षांतर केले. त्यामुळे तिथे पोटनिवडणुका होत आहेत.
त्यातील चार जागा अनुसूचित जाती, ६ जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. या ३१पैकी काँग्रेसकडे ९ जागा, एनडीएने ११ जागा जिंकल्या होत्या. त्यातील ७ आमदार भाजपचे तर दोन जण इतर पक्षांचे होते.
कालिया म्हटले; मंत्र्याची माफी
म्हैसूर : केंद्रीय मंत्री व जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे नेते एचडी कुमारस्वामी यांचा कालिया म्हणून उल्लेख केल्याबद्दल मंगळवारी कर्नाटकचे मंत्री बी. झेड. खान यांनी माफी मागितली. कुमारस्वामी यांच्याबद्दल केलेले वक्तव्य वर्णद्वोषी असल्याचे आरोप करत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने तीव्र शब्दात निषेध केला. मंत्री खान व कुमारस्वामी यांच्यात दृढसंबंध असून, केंद्रीय मंत्र्यांसंदर्भात असे प्रथमच घडले नाही. खान यांनी यापूर्वीदेखील आपुलकीच्या नात्याने कुमारस्वामींसाठी अशा प्रकारच्या शब्दांचा उल्लेख केल्याचे नमूद करत काँग्रेसने वक्तव्यावर सारवासारव केली.