पश्चिम बंगाल, आसाममध्ये आज मतदान
By admin | Published: April 11, 2016 02:25 AM2016-04-11T02:25:34+5:302016-04-11T02:25:34+5:30
आसाममधील विधानसभेच्या उर्वरित ६१ जागांसाठी आज सोमवारी दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान घेण्यात येणार आहे. यासोबतच पश्चिम बंगालच्या ३१ जागांवरही निवडणुकीच्या पहिल्या
कोलकाता/गुवाहाटी : आसाममधील विधानसभेच्या उर्वरित ६१ जागांसाठी आज सोमवारी दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान घेण्यात येणार आहे. यासोबतच पश्चिम बंगालच्या ३१ जागांवरही निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील दुसऱ्या भागाचे मतदान घेण्यात येईल. आसाममध्ये काँग्रेस, भाजपा-आगप-बीपीएफ आघाडी आणि एआययूडीएफ यांच्यादरम्यान तिहेरी लढत आहे.
आसाममध्ये या ६१ जागांसाठी ५२५ उमेदवार रिंगणात आहेत आणि या मतदारसंघांमध्ये १२,६९९ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. यावेळी १,०४,३५,२७२ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी ५० हजारांवर सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत.
पश्चिम बंगालच्या ३१ विधानसभा मतदारसंघात २१ महिलांसह १६३ उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत. पश्चिम मिदनापूर, बांकुरा आणि बुर्दवान या जिल्ह्यांमध्ये हे मतदारसंघ आहेत. ७० लाख मतदार येथे मतदानाचा आपला हक्क बजावतील. या सर्व मतदारसंघात सत्तारूढ तृणमूल काँग्रेस, डावी आघाडी-काँग्रेस युती आणि भाजपा यांच्यात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, माकप सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार केला, तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या प्रचार सभांमध्ये, ‘मी (बॅनर्जी) सर्व २९४ मतदारसंघांमध्ये उमेदवार आहे,’ असे सांगत मतदारांना तृणमूल काँग्रेसच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले होते. मतदानाचा पहिला टप्पा ४ एप्रिल रोजी पार पडला होता. (वृत्तसंस्था)