Voting: आता देशातील कुठल्याही भागातून मतदान करता येणार, निवडणूक प्रक्रियेत मोठा बदल करण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 11:28 AM2022-12-29T11:28:29+5:302022-12-29T14:02:54+5:30
Voting: बदलत्या काळात अनेक जण नोकरी, व्यवसायानिमित्त आपल्या गाव, शहरापासून दूर राहत असतात. निवडणुकीवेळी बऱ्याचदा त्यांना मतदानासाठी जाता येत नाही. त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागते. अशा मतदारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे
नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून आपल्या भारताचा उल्लेख केला जातो. गेल्या ७० वर्षांपासून आपल्या देशामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे. तसेच ग्रामपंचातीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुका नियोजित वेळी होत असतात. या निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाला देण्यात आला आहे. ज्या मतदारसंघात नाव नोंदवलेले असते तेथील मतदान केंद्रात मतदाराला आपल्या मतदानाचा हक्क बजावता येतो. मात्र बदलत्या काळात अनेक जण नोकरी, व्यवसायानिमित्त आपल्या गाव, शहरापासून दूर राहत असतात. निवडणुकीवेळी बऱ्याचदा त्यांना मतदानासाठी जाता येत नाही. त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागते.
अशा मतदारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. आता देशातील कुठल्याही भागातून मतदाराला मतदान करता येणार आहे. त्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठे बदल करण्याची तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून त्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. तसेच त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यांकडून अभिप्राय मागवले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या सुविधेसाठी वेळोवेळी अनेक सुधारणा करण्यात येत असतात. कोरोनाकाळातही मतदारांच्या सुविधेसाठी निवडणूक आयोगाने अनेक तरतुदी केल्या होत्या.