सुनंदा पुष्करच्या हत्येमागे वद्रांचा हात - सुब्रमण्यम स्वामींचा आरोप
By admin | Published: July 4, 2014 10:04 AM2014-07-04T10:04:07+5:302014-07-04T10:48:30+5:30
काँग्रेस नेते शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूमागे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांचा हात आहे असा खळबळजनक आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.
Next
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ४ - काँग्रेस नेते शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूवरून आता एक नवीन वाद निर्माण झाला आहे. सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूमागे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. तसेच स्वामी यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्वामी यांनी हा संशय व्यक्त केला. ते म्हणाले, आयपीएलमधील कोच्ची टस्कर्स संघामध्ये वड्रा यांनी पैसे गुंतवले होते आणि सुनंदा पुष्कर यांना त्यात झालेल्या गैरव्यवहाराबाबत समजले होते. त्यामुळेच त्यांना संपवण्यात आले, असा संशय त्यांनी व्यक्त केला. याप्रकरणी रॉबर्ड वड्रा यांची सासू, म्हणजे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचीही चौकशी व्हायला हवी, असेही ते म्हणाले. तसेच सरकारने याप्रकरणाती चौकशी न केल्यास आपण न्यायालयात जाऊ, असेही त्यांनी सांगितले.
सुनंदा पुष्कर यांचा दिल्लीत मृत्यू झाला होता. दिल्लीतील हॉटेल लीलामध्ये त्या संशयास्पदरित्या मृत आढळून आल्या होत्या. दरम्यान पुष्कर यांचा शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता, असा दावा एम्स फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी केल्यानंतर खळबळ निर्माण झाली होती. मात्र अवघ्या एका दिवसात गुप्ता यांनी आपल्या विधानावरून घूमजाव करत पोस्टमॉर्टम रिपोर्ट योग्य असल्याचे सांगितले.