मतमोजणीवेळी ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची होणार पडताळणी? आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 10:24 AM2019-05-07T10:24:37+5:302019-05-07T10:30:59+5:30
21 विरोधी पक्षांची सर्वोच्च न्यायालयात याचिका
नवी दिल्ली: मतमोजणी करताना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यात यावी, या विरोधकांच्या मागणीवर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. काँग्रेस, टीडीपीसह एकूण 21 विरोधी पक्षांनी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मतमोजणीवेळी व्हीव्हीपॅटमधल्या 50 टक्के पावत्या ईव्हीएमसोबत पडताळून पाहिल्या जाव्यात असे आदेश न्यायालयानं निवडणूक आयोगला द्यावेत, अशी विरोधकांची मागणी आहे.
प्रत्येक विधानसभा क्षेत्रातल्या किमान पाच मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची पडताळणी करण्याचे आदेश गेल्याच महिन्यात न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले. हा आदेश आयोगानं मान्य केला. न्यायालयानं यंदाच्या निवडणुकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीत पाचपट वाढ केली आहे. प्रत्येक मतदारसंघात पाच व्हीव्हीपॅटची ईव्हीएमसोबत पडताळणी करण्याची सूचना न्यायालयानं केली आहे. सध्या केवळ एका व्हीव्हीपॅटची ईव्हीएमसोबत पडताळणी केली जाते.
...तर 23 मे नाही, 24 मे रोजी येणार लोकसभेचे निकाल https://t.co/u5ENaHMBKF#LokSabhaElections2019
— Lokmat (@MiLOKMAT) March 28, 2019
देशाचा विचार केल्यास सध्या निवडणूक आयोग 4125 ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करतो. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही संख्या 20625 वर जाईल. मात्र 21 विरोधी पक्षांनी जवळपास 6.75 लाख ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेससह टीडीपी, एनसीपी, एलजेडी, आप, सपा, टीएमसी, डीएमके या मुख्य पक्षांचा यात समावेश आहे. विरोधकांच्या या मागणीमुळे मतमोजणीला विलंब लागू शकतो. त्यामुळे निकाल उशीरा जाहीर होण्याची शक्यता आहे.