व्यंकय्या नायडू होऊ शकतात उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार
By admin | Published: July 17, 2017 05:20 PM2017-07-17T17:20:46+5:302017-07-17T17:20:46+5:30
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीचं मतदान संपन्न झाल्यानंतर आता उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपानं मोर्चेबांधणी सुरू केली
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीचं मतदान संपन्न झाल्यानंतर आता उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपानं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विरोधकांनी उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून गोपालकृष्ण गांधी यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर भाजपाही व्यंकय्या नायडूंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची तयारी चालवली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय संसदीय मंत्री आणि दक्षिणेतला भाजपाचा मोठा चेहरा म्हणून एनडीएकडून व्यंकय्या नायडूंचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपाचे घटक पक्षही व्यंकय्या नायडूंच्या नावाला सहमती दर्शवू शकतात.
विशेष म्हणजे व्यंकय्या नायडूंच्या नावावर संघानंही सहमती दिल्याची चर्चा आहे. व्यंकय्या नायडू हे आंध्र प्रदेश म्हणजेच दक्षिणेतून येतात. तिथे भाजपाला चांगला असा जनाधार नाही. त्यामुळे दक्षिणेत स्वतःची बाजू भक्कम करण्यासाठी भाजपाकडे याहून चांगली संधी नाही. सुरुवातीला भाजपा दक्षिणेतील कोणत्याही नेत्याला उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरवू शकते, अशी चर्चा होती. मात्र आता उपराष्ट्रपतिपदासाठी व्यंकय्या नायडू यांच्याहून योग्य चेहरा असू शकत नाही, असंही भाजपाच्या धुरिणांना वाटतं. व्यंकय्या नायडू हे संघाचे कार्यकर्ते आहेत. भाजपामध्ये त्यांच्याकडे मोठा आणि जाणकार नेता म्हणून पाहिलं जातं. ब-याचदा भाजपा पक्ष अडचणीत सापडलेला असताना व्यंकय्या नायडू बचावासाठी पुढे येऊन पक्षाची बाजू भक्कमपणे मांडताना पाहायला मिळतात. त्याप्रमाणेच सर्वपक्षीयांशी त्यांचे चांगले संबंध आहेत.
आणखी वाचा
(राज्यपाल राव उपराष्ट्रपतीपदासाठी स्पर्धेत?)
(उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही नितीश कुमारांची मोदींना साथ ?)
(अमित शाह राज्यसभेवर, आनंदीबेन उपराष्ट्रपती?)
येत्या 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आघाडीचा उमेदवार ठरविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या संसदीय मंडळाची बैठक आज सायंकाळी दिलीत बोलाविण्यात आली आहे. केंद्रीय नगरविकास आणि माहिती व नभोवाणीमंत्री एम. व्यंकय्या नायडू हे या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जात असले तरी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे नावही चर्चेत असल्याचे पक्षातील विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
या सूत्रांनुसार पक्षात असा मतप्रवाह आहे की, उपराष्ट्रपतिपदासाठी दक्षिण भारतातील उमेदवार असावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन व राष्ट्रपतीपदाचे उमेदावर रामनाथ कोविंद उत्तरेकडील असल्याने उपराष्ट्रपतिपद देशाच्या दक्षिणेकडील राज्याकडे जावे, असे मत पक्षात तयार होत आहे.