मजूर झाला अब्जाधीश! खात्यात होते 17 रुपये, अचानक जमा झाले 100 कोटी अन्...; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 03:42 PM2023-05-27T15:42:30+5:302023-05-27T15:51:56+5:30
बँकेच्या खात्यात 17 रुपये असताना अचानक 100 कोटी जमा झाले.
पश्चिम बंगालमध्ये मजुरी करणाऱ्या मोहम्मद नसिरुल्ला मंडल याच्यासोबत एक अजब घटना घडली आहे. त्याच्या नशिबात गरिबी लिहिली असून तो दोन वेळच्या भाकरीसाठी कष्ट करतो पण नशिबानेही त्याची चेष्टा केली. बँकेच्या खात्यात 17 रुपये असताना अचानक 100 कोटी जमा झाले. इंडिया टुडे मधील एका बातमीनुसार, मंडलच्या खात्यात फक्त 17 रुपये होते आणि कोणतेही उत्पन्न नसल्यामुळे त्याने कधीही आपला बॅलेन्स तपासला नाही. अचानक एके दिवशी सायबर सेलचे काही अधिकारी नोटीस घेऊन त्याच्या घरी पोहोचले.
मंडलच्या खात्यात 1-2 नव्हे तर 100 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती त्या अधिकाऱ्यांकडूनच मंडलला मिळाली. सायबर सेलने त्याला नोटीस पाठवून 30 मे रोजी बोलावल् आहे, जिथे खात्यात अचानक पैसे आल्याबद्दल चौकशी केली जाईल. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बासुदेवपूर येथील रहिवासी नसिरुल्ला मंडल म्हणतो की, "पोलिसांचा फोन आल्यानंतर माझी झोप उडाली आहे. मी काय केले हे मलाही माहीत नाही."
"अचानक माझ्या खात्यात 100 कोटी आले आणि खरं सांगायचं तर माझा विश्वासच बसत नाही. मी माझे खाते अनेक वेळा तपासले आणि प्रत्येक वेळी मी त्यात 100 कोटी जमा केलेले पाहिले तेव्हा मला आश्चर्य वाटले. यानंतरही मी थेट पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) शाखेत धाव घेतली आणि या व्यवहाराची चौकशी केली." नसिरुल्लाने सांगितले की, बँकेत गेल्यावर त्याला कळलं की त्याचं खातं ब्लॉक झालं आहे.
ब्लॉक होण्यापूर्वी खात्यात फक्त 17 रुपये होते. मात्र, जेव्हा त्याने Google Pay द्वारे त्याचे खाते तपासले तेव्हा त्यात जमा केलेली रक्कम 7 अंकांमध्ये दिसून आली. शेवटी माझ्या खात्यात एवढी मोठी रक्कम आली कुठून? मी रोजंदारी मजूर आहे. पोलीस मला पकडून मारतील या भीतीने मी दिवसभर घालवला. माझ्या घरीही लोक रडायला लागले. बँकेने माझं खातंही तात्पुरतं सस्पेंड केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.