पाच रुपयांसाठी खलीने केली मजुरी
By admin | Published: January 31, 2017 12:36 AM2017-01-31T00:36:14+5:302017-01-31T00:36:14+5:30
‘द ग्रेट खली’ म्हणून जगभर नावलौकिक असलेल्या दलिपसिंह राणाचे बालपण अत्यंत हलाखीत गेले. शाळेचे शुल्क अडीच रुपये होते. मात्र, आई-वडिलांकडे तेवढेही पैसे
नवी दिल्ली : ‘द ग्रेट खली’ म्हणून जगभर नावलौकिक असलेल्या दलिपसिंह राणाचे बालपण अत्यंत हलाखीत गेले. शाळेचे शुल्क अडीच रुपये होते. मात्र, आई-वडिलांकडे तेवढेही पैसे नसल्याने खलीला शाळेला रामराम ठोकून रोपे लावण्याचे काम करावे लागले. तेव्हा खली होता अवघ्या आठ वर्षांचा. शाळा सोडण्यापासून मजुरी काम करण्यापर्यंत खलीने सर्व काही केले. असामान्य अंगकाठीमुळे टिंगलटवाळीचा विषय बनलेल्या खलीने कुस्तीची निवड केली आणि ते करून दाखविले जे आजपर्यंत एकाही भारतीयाला करता आलेले नाही. डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये प्रवेश मिळविणारे ते पहिले भारतीय आहेत. शाळेत असताना अधिक उंचीमुळे मित्र त्यांच्यावर हसायचे. पैसेही नव्हते शिकायला. हा काळ अत्यंत खडतर होता. ‘पावसाअभावी पिके वाळली होती आणि आमच्याकडे शुल्क भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे १९७९ च्या उन्हाळ्यात मला शाळेतून काढून टाकण्यात आले. शुल्क न भरल्याने वर्गशिक्षकाने भर वर्गात मला अपमानित केले तसेच सर्व विद्यार्थ्यांनी माझी टर उडविली. त्याच दिवशी शाळेत कधीही न जाण्याचा मी निश्चय केला.’, असेहे त्यांनी पुस्तकात लिहिले आहे. एक दिवस वडिलांसोबत असताना गावात रोजदारी कामासाठी मजूर हवा आहे, पाच रुपये रोज मिळेल, असे समजले. माझ्यासाठी तेव्हा पाच रुपये खूप मोठी रक्कम होती. मला केवळ अडीच रुपये नसल्यामुळे शाळा सोडावी लागली होती आणि पाच रुपये तर त्याहून दुप्पट होते. मला गावातील रोपवाटिकेतून रोपे नेऊन ती ४ कि.मी. दूर डोंगरावर लावण्याचे काम मिळाले. रोपांची खेप डोंगरावर नेल्यानंतर त्यांची लागवड करून पुन्हा रोपे नेण्यासाठी खाली गावात यावे लागत होते. पहिली मजुरी मिळाली तो क्षण मला आजही आठवतो. तो अनुभव मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. ती आठवण माझ्या सर्वांत सुखद आठवणींपैकी एक आहे, असे ते लिहितात.