वाघूर जलवाहिनीला चर्चजवळ गळती लाखो लीटर पाण्याची नासाडी: अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये शिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2016 06:26 PM2016-06-26T18:26:41+5:302016-06-26T18:26:41+5:30
जळगाव: वाघूर मुख्य जलवाहिनीला रामानंदनगर रस्त्यावर चर्चजवळ रविवारी सकाळी अचानक गळती लागल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. दरम्यान दोन पाईपच्या जॉईंटवरील रिंग पाण्याच्या दाबामुळे सटकली असल्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे. रविवारी पाणीपुरवठा सुरळीत झाला असून सोमवारी ही गळती आपोआप थांबते का? याची पाहणी केल्यानंतर दुरूस्तीबाबत निर्णय घेता येईल.
Next
ज गाव: वाघूर मुख्य जलवाहिनीला रामानंदनगर रस्त्यावर चर्चजवळ रविवारी सकाळी अचानक गळती लागल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. दरम्यान दोन पाईपच्या जॉईंटवरील रिंग पाण्याच्या दाबामुळे सटकली असल्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे. रविवारी पाणीपुरवठा सुरळीत झाला असून सोमवारी ही गळती आपोआप थांबते का? याची पाहणी केल्यानंतर दुरूस्तीबाबत निर्णय घेता येईल. मनपाच्या वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागण्याचे प्रकार सातत्याने सुरूच आहेत. पाण्याचा दबाव येत असल्याने गळती लागण्याचे प्रकार वारंवार होत असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगितले जात आहे. त्यासाठी हवेचा दाब कमी करण्यासाठी एअर प्रेशर व्हॉल्वही बसविण्यात आले आहेत. तरीही गळती लागण्याचे प्रकार सुरूच आहेत. रविवारी सकाळी वाघूर जलवाहिनीला रामानंदनगर रस्त्यावर चर्चसमोर अचानक मोठी गळती लागली. बघणार्यांना जलवाहिनी फुटली, असाच भास झाला. लाखो लीटर पाणी वाया गेले. नवीन बांधकामाच्या ठिकाणी शिरले पाणीजलवाहिनीच्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर वाहू लागले. गळती लागलेल्या ठिकाणा शेजारीच एक अपार्टमेंट असून त्यालगत नवीन बांधकाम सुरू आहे. हे पाणी नवीन बांधकामाच्या बेसमेंटमध्ये शिरले. तेथून पाझरून हे पाणी गळती लागलेल्या ठिकाणाशेजारच्या अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये शिरले. तेथील गटारीतून हे पाणी वाहताना दिसत होेते. रिंग सटकल्याने गळतीयाबाबत पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी.एस. खडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, यापूर्वीही दोन पाईपच्या जोडावरील रिंग पाण्याच्या दाबामुळे सटकल्याने गळती लागली होती. मात्र दुसर्या दिवशी पुन्हा रिंग जागेवर सरकल्याने गळती आपोआप बंद झाली होती. त्यामुळे सोमवारी पुन्हा गळती लागते की आपोआप बंद होते? याची पाहणी केली जाईल. मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत असल्यास दुरुस्तीबाबत निर्णय घेतला जाईल. दरम्यान रविवारी मात्र सुरळीत पाणीपुरवठा झाल्याचे त्यांनी सांगितले.