मुकाबल्याची वाट बघा - नरेंद्र मोदी
By admin | Published: July 18, 2015 03:31 AM2015-07-18T03:31:50+5:302015-07-18T03:31:50+5:30
विरोधकांनी केलेल्या एकजुटीमुळे वादळी ठरणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ‘मुकाबल्याची वाट बघा’असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचा आखाडा होण्याचे संकेत दिले.
जम्मू : विरोधकांनी केलेल्या एकजुटीमुळे वादळी ठरणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ‘मुकाबल्याची वाट बघा’असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचा आखाडा होण्याचे संकेत दिले.
शुक्रवारी येथे जम्मू-काश्मीरमधील एकेकाळचे ज्येष्ठ नेते गिरधारीलाल डोगरा यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात त्यांच्या सोबत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करणसिंग हेही एकाच व्यासपीठावर होते. संसदेत विशेषत: राज्यसभेत विरोधकांनी चालविलेली कोंडी पाहता मोदींच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
विसंगतीतच लोकशाहीची सुंदरता आहे, असे सांगत त्यांनी राजकारणातील तात्त्विक अस्पृश्यतेवर प्रहार केला. व्यासपीठावर बसलेल्या काँग्रेस नेत्यांकडे (आझाद) अंगुलीनिर्देश करताना ते म्हणाले की, आम्ही सर्वजण येथे बसलो आहोत; मात्र काही दिवसच प्रतीक्षा करा, तुम्हाला मुकाबला बघायला मिळेल. संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होत असून विरोधकांनी व्यापमं घोटाळा, ललितगेट ते जनगणनेच्या मुद्यावर एकजूट केल्याने गुरुवारी रालोआ मंत्र्यांनी व्यूहरचनेवर चर्चा केली.
- मोदींनी घराणेशाहीच्या राजकारणावर खोचक बोलताना अप्रत्यक्षरीत्या काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्या जमीन सौद्यासंबंधी वादाचा उल्लेख केला. डोग्रा यांनी जम्मू-काश्मीरचे अर्थमंत्री असताना २६ अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता; मात्र त्यांनी आपल्या कुटुंबियांसाठी जावई तथा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासाठी काहीही केले नाही. डोग्रा आणि जेटली यांनी आपापला सार्वजनिक जीवनाचा मार्ग अवलंबला. सध्या जावयांबद्दल कोणत्या प्रकारच्या चर्चा सुरू आहेत हे आपल्याला माहीतच आहेत, असा टोलाही त्यांनी हाणला.
(वृत्तसंस्था)