प्रतीक्षा संपली; लस घेऊन विमाने झेपावली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 05:15 AM2021-01-13T05:15:20+5:302021-01-13T05:15:31+5:30
१४ जानेवारीपर्यंत सर्व लसी पाेहाेचणार, पहिल्या दिवशी १३ राज्यांमध्ये वाहतूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काेराेनाच्या लसीसाठी अखेर प्रतीक्षा संपली आहे. आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या ‘काेविशिल्ड’ लसीचे ५४ लाखांहून अधिक डोस पुण्यातून १३ राज्यांमध्ये पाेहाेचले आहेत, तर १४ जानेवारीपर्यंत सर्व १.६५ काेटी डोस इतर राज्यांमध्ये पाेहाेचविले जाणार आहेत. देशभरात १६ जानेवारीला काेराेना लसीकरणाचा शुभारंभ हाेणार असून, पुणे विमानतळ लस वाहतुकीचे हब बनले आहे.
सीरम इन्स्टिट्यूटच्या लसीचे वितरण मंगळवारपासून सुरू झाले. केंद्र सरकारने ‘सीरम’ला १ काेटी १० लाख लसींची ऑर्डर दिली आहे, तर दुसऱ्या टप्प्यात ४.५ काेटी लसींची ऑर्डर देण्यात येणार आहे. भारत बायोटेककडून ५५ लाख लसी विकत घेण्यात येणार आहेत. त्यापैकी १६.५ लाख लसी मोफत देण्यात येणार आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, चेन्नई, काेलकाता, गुवाहाटी, हैदराबाद, शिलाँग, अहमदाबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पाटणा, बंगळुरू, लखनाै आणि चंदीगड या १३ शहरांमध्ये लस पाठविण्यात आली आहे.
१६ जानेवारीपासून लसीकरण
आणखी ४ लसी हाेणार उपलब्ध
nकाेविशिल्ड आणि काेव्हॅक्सिन या दाेन लसींनंतर भारतात लवकरच आणखी ४ कंपन्या काेराेना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अर्ज करणार आहेत. त्यामुळे भारतात एकूण ६ लसींचा पर्याय उपलब्ध हाेणार असल्याची माहिती आराेग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली.
nझायडस-कॅडीला, स्पुटनिक व्ही, बायाेलाॅजिकल इव्हांस आणि जिनाेव्हा या कंपन्या भारतात लस आणणार आहेत. इतर काेणत्याही देशांमध्ये एवढे पर्याय उपलब्ध नाहीत, असे भूषण म्हणाले.
nलसीच्या दाेन मात्रांमध्ये २८ दिवसांचे अंतर राहणार आहे. पहिली मात्रा दिल्यानंतर १४ दिवसांनी प्रतिकार शक्ती तयार हाेण्यास सुरुवात हाेते. त्यामुळे लस घेतल्यानंतर लगेचच आपण सुरक्षित झालाे, असे मानू नये.
काेलकात्यात १० लाख
सर्वाधिक सुमारे १० लाख लसी काेलकातामध्ये पाठविण्यात आल्या आहेत. त्यानंतर दिल्ली, बंगळुरू आणि पाटणा या शहरांमध्ये लसी पाठविण्यात आल्या आहेत. स्पाइसजेट, इंडिगाे आणि गाे एअरच्या विमानांमधून लसीची वाहतूक करण्यात येत आहे.