मान्सूनच्या प्रतीक्षेत देश तहानलेलाच; जून महिन्यात ३७ टक्के कमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 05:42 AM2023-06-19T05:42:52+5:302023-06-19T06:33:40+5:30

हवामान खात्याने नऊ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 

Waiting for monsoon, the country is thirsty; 37 percent less rainfall in the month of June | मान्सूनच्या प्रतीक्षेत देश तहानलेलाच; जून महिन्यात ३७ टक्के कमी पाऊस

मान्सूनच्या प्रतीक्षेत देश तहानलेलाच; जून महिन्यात ३७ टक्के कमी पाऊस

googlenewsNext

नवी दिल्ली : यावर्षी मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे संपूर्ण देशाला घाम फुटला आहे. ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळामुळे गुजरात आणि राजस्थानमध्ये मुसळधार पावसाने थैमान माजविले आहे.

इशान्येकडील राज्यांमध्ये पूर आला आहे. त्याचवेळी उर्वरित देश पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेल्या तीन दिवसांत सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे ९८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील ५४ आणि बिहारमधील ४४ जणांचा समावेश आहे. हवामान खात्याने नऊ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 

‘बिपोरजॉय’ चक्रीवाळामुळे मान्सून काही दिवसांपासून तळकोकणातच रेंगाळला आहे. तोदेखील हळूहळू पुढे सरकणार आहे. त्यामुळे पावसासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षाच आहे. २३ ते २९ जून या काळात तळकोकणसहित संपूर्ण कोकण व गोवा उपविभागात मान्सून अधिक सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

या राज्यांना उष्णतेचा फटका
उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. या राज्यांमध्ये आतापर्यंत मान्सून दाखल होतो. यावेळी पावसासाठी ही राज्ये आतुरलेली आहेत.

या राज्यांना पावसाचा तडाखा
अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा आणि सिक्कीम या ईशान्येकडील राज्यांमध्येही पाऊस पडत आहे. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदी दुथडी भरून वाहत आहे. १३ जिल्ह्यांतील ३८ हजारांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. केरळमध्ये पावसाने हजेरी लावली असून तेथे संततधार सुरू आहे. तर तामिळनाडूच्या काही भागात पावसाने हजेरी लावली.

उष्णतेच्या लाटेत ९८ मृत्यू
उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात १५, १६ आणि १७ जून रोजी ४०० लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील बहुतेकांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे. येथील तापमान ४४ अंशांच्या आसपास नोंदवले गेले आहे. बिहारमध्ये सहा जिल्ह्यांमध्ये रेड तर आठ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बिहार आणि झारखंडमध्ये सर्व शाळा तसेच अंगणवाड्यांना २४ जूनपर्यंत सुटी जाहीर केली आहे. 

आंतरराज्य स्पर्धेत धावपटू पडली बेशुद्ध
ओडिशामध्ये उष्णतेच्या लाटेत पहिल्या मृत्यूची अधिकृत नोंद झाली. आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारला मिळाली आहे, ज्यात बालासोर जिल्ह्यातील एक मृत्यूचा समावेश आहे. इतर मृत्यूंचा तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. येथे आंतरराज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत महिला धावपटू तेजस्विनी शंकर उष्णतेमुळे बेशुद्ध पडली. 

Web Title: Waiting for monsoon, the country is thirsty; 37 percent less rainfall in the month of June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.