केवळ नियम करून स्वातंत्र्य मिळत नाही, त्यासाठी चांगली कामगिरीही करावी लागते; सरकारचा उर्जित पटेलांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 10:45 AM2018-03-27T10:45:14+5:302018-03-27T10:45:14+5:30
फक्त कायदेशीर गोष्टी याच महत्त्वाच्या नसून रिझर्व्ह बँकेची प्रत्यक्ष कृतीही तितकीच महत्त्वाची आहे.
नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेला अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य केवळ नियम तयार करून मिळणार नाही, तर त्यासाठी चांगली कामगिरी आणि निर्णय घेण्याची आवश्यकता असते, असे सांगत केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना टोला लगावला. काही दिवसांपूर्वी उर्जित पटेल यांनी पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यासंदर्भात भाष्य करताना म्हटले होते की, रिझर्व्ह बँक मर्यादांचे ओझे घेऊन वावरत आहे. घोटाळा झाल्यास सरकारी बँकांवर कारवाई करण्याबाबत रिझर्व्ह बँकेवर कमालीच्या मर्यादा आहेत. विविध कायद्यांमुळे कारवाई करता येणे अशक्य आहे, असे सांगत उर्जित पटेल यांनी हतबलता व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना अरविंदर सुब्रमणियन यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, स्वातंत्र्य हे केवळ नियम करूनच मिळत नाही. किंबहुना स्वातंत्र्य हे बहुतांशी चांगल्या व प्रभावी निर्णयांची परंपरा आणि प्रतिष्ठेवर अवलंबून असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा रिझर्व्ह बँकेच्या विश्वासर्हतेचा दाखला देता, तेव्हा केवळ स्वातंत्र्यच अभिप्रेत नसते. तुम्ही स्वतंत्र असाल आणि एकापाठोपाठ एक चुकीचे निर्णय घेत असाल तर तुमची विश्वासर्हता रसातळाला जाऊ शकते. त्यामुळे फक्त कायदेशीर गोष्टी याच महत्त्वाच्या नसून रिझर्व्ह बँकेची प्रत्यक्ष कृतीही तितकीच महत्त्वाची आहे, असे सुब्रमणियन यांनी म्हटले.
त्यामुळे आता सुब्रमणियन यांच्या विधानावर उर्जित पटेल नेमकी काय प्रतिक्रिया देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उर्जित पटेल यांनी पूर्वसुरी रघुराम राजन यांच्या काळातही रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार यांच्यात अनेकदा खटके उडाले होते. सरकारकडून रिझर्व्ह बँकेवर व्याजदर कमी करण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात असल्याचेही अनेकदा निदर्शनास आले आहे.