राष्ट्रपित्याचे स्वप्न पूर्ण करण्याकडे वाटचाल
By admin | Published: January 31, 2016 12:41 AM2016-01-31T00:41:34+5:302016-01-31T00:41:34+5:30
खादीच्या माध्यमाने देशवासीयांना स्वावलंबी बनविण्याचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने आपले सरकार आगेकूच करीत असून विविध सरकारी आस्थापनांमध्ये
नवी दिल्ली : खादीच्या माध्यमाने देशवासीयांना स्वावलंबी बनविण्याचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने आपले सरकार आगेकूच करीत असून विविध सरकारी आस्थापनांमध्ये खादीच्या उत्पादनांचा वापर केला जात आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिली.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान मोदी यांच्यासह साऱ्या देशाने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला त्यांना श्रद्धांजली वाहिली. नव्याने स्थापित खादी आणि ग्रामोद्योग आयोग नव्या संधी आणि आव्हाने लक्षात घेऊन अनेक महत्त्वाची पावले उचलित आहे. याअंतर्गत सौर चरखा आणि सौरलूमद्वारे उत्पादनाचा यशस्वी प्रयत्न होत आहेत. स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका वठविणारी खादी आज फॅशन झाली असून गावागावात खादी व ग्रामोद्योगाचे जाळे तयार करण्याची सरकारची मनीषा आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान राष्ट्रपती मुखर्जी, उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, पंतप्रधान मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांनी राजघाटवरील बापूंच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आणि नगरविकास मंत्री एम.वेंकय्या नायडू, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यासह अन्य नेत्यांचाही यात समावेश होता.
नायडू यांच्या हस्ते राजघाटावर कस्तुरबा स्मृती केंद्र आणि सुरक्षा नियंत्रण कक्षाचे उद्घाटन यानिमित्त करण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राष्ट्रपित्याच्या पुण्यतिथीनिमित्त राजघाटावर प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री महेश शर्मा, बाबुल सुप्रियो, राव इंद्रजीतसिंग, तीनही सेनांचे प्रमुख जनरल दलबिरसिंग, एअर चीफ मार्शल अरुप राहा आणि अॅडमिरल रॉबिन धवन यावेळी उपस्थित होते. तोफांची सलामी आणि भजनाचा कार्यक्रम झाला. हुतात्मादिनी देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.