...म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांना व्हिएतनाममध्ये घ्यायचा होता पुनर्जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 01:00 PM2019-01-29T13:00:45+5:302019-01-29T13:09:43+5:30
पुनर्जन्मसारखी गोष्ट अस्तित्वात असेल तर मला व्हिएतनाममध्ये जन्म घ्यायला आवडेल, असे जॉर्ज फर्नांडिस यांनी एकदा म्हटले होते
हैदराबाद - माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी (29 जानेवारी) निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना अल्झायमर नावाचा दुर्धर आजार झाल्याचे निदान झाले होते.दरम्यान, पुनर्जन्मसारखी गोष्ट अस्तित्वात असेल तर मला व्हिएतनाममध्ये जन्म घ्यायला आवडेल, असे जॉर्ज फर्नांडिस यांनी एकदा म्हटले होते
जवळपास 15 वर्षांपूर्वी बंगळुरूमध्ये झालेल्या ‘कर्नाटक प्लान्टर्स असोसिएशन’च्या वार्षिक संम्मेलनामध्ये संबोधित करताना फर्नांडिस यांनी पुनर्जन्मासंदर्भात विधान केले होते. व्हिएतनाममधील नागरिक शिस्तबद्ध, एखाद्या गोष्टीप्रति समर्पित आणि ठोस निर्णय घेणारे असल्याचे सांगत फर्नांडिस यांनी व्हिएतनाम देशाचे कौतुक केले होते.
ते पुढे असंही म्हणाले होते की, जागतिक कॉफी बाजारपेठेत व्हिएतनामचा मोठा हिस्सा आहे. याप्रति मला कोणतीही ईर्ष्या नाही. व्हिएतनाम देशाचा मी चाहता आहे आणि जलद प्रगतीसाठी दक्षिण पूर्व आशियाई देश व तेथील नागरिकांची प्रशंसा करतो.
फर्नांडिस यांनी असेही म्हटले होते की, ‘‘ पुनर्जन्मसारखी गोष्ट अस्तित्वात असेल तर मी व्हिएतनाममध्ये जन्म घेऊ इच्छितो. एखादी गोष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी त्याप्रति समर्पित होऊन जीवाची बाजी लावण्यात येथील नागरिक तत्पर असतात.’’ विशेष म्हणजे व्हिएतनामचा दौरा करणारे फर्नांडिस पहिले संरक्षण मंत्री होते. त्यांचा जन्म मंगळुरू येथे झाला होता.