भूगोलामध्ये करिअर करायचं आहे? मग या करिअर वाटांची माहिती घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 12:47 PM2018-07-18T12:47:53+5:302018-07-18T13:51:43+5:30
भूगोलातील शिक्षणानंतर करिअरचे मार्ग जाणून घ्या, अध्यापनापासून पर्यटनापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये संधी
मुंबई- तुम्हाला चार भिंतींच्या बाहेरच्या निसर्गाची आवड आहे का? इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायची आवड आणि इच्छा आहे असेल आणि मुख्य म्हणजे जगभरात काय चाललं आहे हे जाणून घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही भूगोल या विषयाची निवड करिअरसाठी करु शकता.
भूगोल या विषयामध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची सोय भारतातील बहुतांश विद्यापिठांमध्ये उपलब्ध आहे. या विद्यापिठांमध्ये तीन वर्षांचा बी.ए. आणि दोन वर्षांचा एम.ए,. किंवा एम.एस्सी हे अभ्यासक्रम पदवीनंतर शिकवले जातात. त्यानंतर काही विद्यापिठांमध्ये जीआयएस म्हणजे जिओग्राफिकल इन्फर्मेशन सिस्टीम व रिमोट सेन्सिंगचे अभ्यासक्रम शिकवण्याची सोय असते. भूगोल या विषयाशी संबंधित पर्यटन हे क्षेत्र असल्यामुळे पर्यटनासंबंधित अभ्यासक्रम ही या विद्यापिठांमध्ये शिकवले जाते.
भूगोल विषयातून शिक्षण घेतल्यावर कोणत्याप्रकारच्या संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात?
1) कार्टोग्राफर म्हणजे नकाशे तयार करणे. या मध्ये विविध आधुनिक तंत्रानी नकाशे तयार करण्याचे ज्ञान दिले जाते.
2) एन्व्हायर्नमेंट कन्सल्टंट- यामध्ये पर्यावरणासंबंधी शिक्षण दिलं जाते, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्येही यासाठी विशेष पदे असतात.
3) लँडस्केप आर्किटेक्ट- भूगोलाचे विद्यार्थी लँडस्केपिंग चांगल्या प्रकारे करु शकतात.
4) जीआयएस अधिकारी- आजकाल सर्व क्षेत्रात जीआयएसचे महत्व वाढले आहे त्यामुळे जीआयएस येणाऱ्या तज्ज्ञांची गरज कंपन्यांना भासते.
5) अध्यापन- भूगोल विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नेट-सेट या परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर असिस्टंट लेक्चरर पदासाठी काम करता येईल, तसेच विविध शाळांमध्ये अध्यापनासाठीही तयारी करता येईल.
6) पर्यटन- पर्यटन क्षेत्र आज वेगाने विस्तारत आहे. भूगोलाचे पदव्युत्तर शिक्षण घेताना पर्यटनाचा अभ्यासक्रमात समावेश असेल तर उत्तम किंवा पर्यटनामध्ये पदविका मिळवल्यास देश-विदेशातील कंपन्यांमध्ये संधी मिळू शकते. तसेच याबरोबर एखादी परदेशी भाषेची जोड देता आली तर इतरांपेक्षा लवकर प्राधान्य मिळेल.