कायमस्वरूपी कराल वर्क फ्रॉम होम? त्यासाठी चालेल का पगार कपात?; ऐका भारतीयांची 'मन की बात'
By कुणाल गवाणकर | Published: November 26, 2020 08:00 PM2020-11-26T20:00:08+5:302020-11-26T20:16:18+5:30
भारतीयांना आवडतोय वर्क फ्रॉम होमचा पर्याय; घराला वेळ देता येत असल्यानं महिला वर्ग खूष
मुंबई: संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना संकटानं माणसाच्या आयुष्यातील अनेक गोष्टी बदलल्या. कोरोनाची लस अद्याप तरी मिळाली नसल्यानं धोका कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेले निर्बंध यापुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. कोरोना संकटात अनेक जण वर्क फ्रॉम करत आहेत. यापुढेही वर्क फ्रॉम होमचा पर्याय बऱ्यापैकी कायम राहील, असा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर मॅवेरिक्स इंडियानं केलेल्या सर्वेक्षणातून महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे.
७० टक्के लोकांनी 'हा' उपाय केल्यास नियंत्रणात येईल कोरोनाचा प्रसार; संशोधनातून खुलासा
जगातल्या अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमचा पर्याय देऊ केला आहे. भारतीयांनादेखील हा पर्याय आवडत असल्याचं दिसत आहे. मॅवेरिक्स इंडियानं 'कोविड-१९ अँड बियॉण्ड: ऍन इव्हॉल्विंग पर्सपेक्टिव्ह' नावानं एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या सर्वेक्षणात देशातील ७२० जणांनी सहभाग घेतला. यातल्या ५४ टक्के जणांनी 'वर्क फ्रॉम होम'च्या पर्यायाला पसंती दर्शवली. यातल्याच ३४ टक्के कर्मचाऱ्यांनी कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम मिळत असल्यास १० टक्के पगार कपात चालेल, असं मत व्यक्त केलं. प्रवासावर होणारा खर्च पगारातून कमी केला तर काय हरकत काय, असा या वर्गाचा मतप्रवाह आहे. कार्यालय गाठण्यासाठी दीड तासाहून अधिक वेळ प्रवास करणाऱ्या ८१ टक्के कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम कायमस्वरुपी चालेल, असं मत नोंदवलं.
अरे बापरे! कोरोनावरील कोणतीही लस घेतली, तरीही 'हे' साईड इफेक्ट्स दिसणारच?
वर्क फ्रॉम होमवर महिला खूष
महिला कर्मचाऱ्यांनादेखील वर्क फ्रॉम होमचा पर्याय उत्तम वाटत आहे. सध्या प्रमाणे काम सुरू असल्यास काहीच हरकत नाही, असं मत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचं प्रमाण ५६ टक्के इतकं आहे. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असलेल्या ८० टक्के महिलांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय अतिशय चांगला वाटतो. नव्या पर्यायामुळे काम आणि घराच्या जबाबदाऱ्या अतिशय व्यवस्थित सांभाळता येत असल्याचं या महिलांचं मत आहे.
घरात राहूनही होऊ शकते धुळीच्या एलर्जीची समस्या; तज्ज्ञांनी सांगितली लक्षणं अन् बचावाचे उपाय
कर्मचाऱ्यांमधील कोरोनाची भीती घटली
कर्मचाऱ्यांच्या मनातील कोरोनाची भीती कमी होत असल्याचं सर्वेक्षण सांगतं. एप्रिलमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यावर ६६ टक्के कर्मचाऱ्यांना कोरोनाची भीती होती. मात्र आता हेच प्रमाण ३९ टक्क्यांवर आलं आहे. तरुणाईच्या मनातील कोरोनाची भीती ३३ टक्क्यांनी कमी झाली आहे. चेन्नईतील ७४ टक्के कर्मचारी एप्रिलमध्ये कोरोनाबद्दल चिंतित होते. ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण थेट २८ टक्क्यांवर आलं आहे. कोलकात्यामधील कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती मात्र वाढली आहे. एप्रिलमध्ये इथल्या ५४ टक्के लोकांना कोरोनाची भीती वाटत होती. ऑक्टोबरमध्ये हेच प्रमाण ६२ टक्क्यांवर पोहोचलं आहे.