ऑनलाइन पोपट खरेदी करायला गेली अन् तिचाच झाला पोपट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 10:19 AM2018-07-02T10:19:59+5:302018-07-02T10:20:12+5:30
कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एक मजेदार प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेला पोपट पाळायचा होता. त्यासाठी तिनं ऑनलाइन पद्धतीनं ऑर्डर दिली. परंतु अखेरपर्यंत ऑर्डर न आल्यानं तिचाच पोपट झाला आहे.
बंगळुरू- कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एक मजेदार प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेला पोपट पाळायचा होता. त्यासाठी तिनं ऑनलाइन पद्धतीनं ऑर्डर दिली. परंतु अखेरपर्यंत ऑर्डर न आल्यानं तिचाच पोपट झाला आहे. या पोपट खरेदी प्रकरणात त्या महिलेची 71 हजार 500 रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. हे प्रकरण सरजापूर रोडवरील विजयकुमार या परिसरात उघडकीस आलं आहे.
महिलेनं या प्रकाराची सायबर क्राइममध्ये तक्रार दिली आहे. श्रीजा नावाच्या महिलेनं पोलिसांना सांगितलं की, ब-याच दिवसांपासून मला पोपट पाळण्याची इच्छा होती. मी ऑनलाइन पोपट खरेदी करता येऊ शकतो का, याचा शोध घेत होती. त्याच दरम्यान माझा बॉबी नावाच्या व्यक्तीशी माझा संपर्क आला. त्यानं त्याचा व्हॉट्सअॅप नंबरही मला दिला. त्यामुळे मला तो विश्वासास पात्र असल्याचं वाटलं. परंतु त्यानं माझी फसवणूक केली. बॉबीशी पोपट घेण्यासंदर्भात बोलणी झाल्यानंतर श्रीजानं बॉबीच्या विविध बँक खात्यात 21 जूनपासून 23 जूनपर्यंत पैसे ट्रान्सफर केले होते. बॉबीच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्यानंतरही श्रीजाला काही पोपट मिळाला नाही. जेव्हा श्रीजानं बॉबीला फोन केला, त्यावेळी त्यानं श्रीजाला काहीही उत्तर दिलं आहे. तसेच व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवल्यानंतरही बॉबीनं काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर श्रीजाला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.
25 जून रोजी तिने सायबर क्राइम आणि पोलिसांत जाऊन गुन्हे दाखल केले. श्रीजाच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस श्रीजानं पैसे ट्रान्सफर केलेल्या त्या आरोपीच्या बँक खात्यांचा तपास करत आहे. तसेच पोलिसांनी ऑनलाइन पद्धतीनं होणा-या फसवणुकीवर वारंवार जनजागृती केल्याचंही सांगितलं आहे.