"मी इशारा देतोय, वक्फची एक इंचही संपत्ती सोडणार नाही’’, असदुद्दीन ओवेसींचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 11:02 IST2025-02-05T11:01:04+5:302025-02-05T11:02:22+5:30
waqf board amendment bill : एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीमध्ये वक्फ विधेयकाला तीव्र विरोध केला. तसेच सध्याच्या स्वरूपात हे विधेयक सादर करण्यावरून त्यांनी मोदी सरकारला इशाराही दिला आहे. या

"मी इशारा देतोय, वक्फची एक इंचही संपत्ती सोडणार नाही’’, असदुद्दीन ओवेसींचा व्हिडीओ व्हायरल
मागच्या काही दिवसांपासून वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून देशातील राजकारणामध्ये मोठी घुसळण होत आहेत. एकीकडे सत्ताधारी भाजपा मित्रपक्षांच्या मदतीने हे विधेयक पारित करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. तर विरोधी पक्षांकडून मात्र या विधेयकाला विरोध होत आहे. दरम्यान, विधेयकामुळे देशात सामाजित अस्थिरता निर्माण होईल. मुस्लिम समाजाने या विधेयकाला त्याच्या सध्याच्या स्वरूपात नाकारलेलं आहे. कारण हे विधेयक भारतीय राज्यघटनेमधील कलम २५, २६ आणि १४ चं उल्लंघन करतं, असा दावा असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेमध्ये आपल्या भाषणादरम्यान सांगितले की, मी सरकारला सावधगिरीचा इशारा देतो की, जर तुम्ही सध्याच्या स्वरूपात वक्फ विधेयक संसदेत आणलं आणि त्याचं कायद्यात रूपांतर केलं तर त्यामुळे देशात सामाजिक अस्थिरता निर्माण होईल. हे विधेयक संपूर्ण मुस्लिम समाजाने नाकारलेलं आहे. वक्फ विधेयकाच्या सध्याच्या मसुद्याचं कायद्यात रूपांतर झालं तर ते घटनेतील कलम २५, २६ आणि १४ चं उल्लंघन ठरेल. आम्ही कुठलीही वक्फ संपत्ती सोडणार नाही. काहीही सोडणार नाही.
हे विधेयक देशाच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरेल असा दावा करताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, तुम्हाला विकसित भारत बनवायचा आहे. आम्हालाही विकसित भारत बनवायचा आहे. मात्र तुम्ही देशाला ८० आणि ९० च्या दशकात घेऊन जाऊ इच्छित आहात. जर असं काही घडलं तर ती तुमची जबाबदारी असेल. कारण एक सन्माननीय भारतीय मुसलमान म्हणून मी माझ्या मशिदीचा एक इंच भागही गमावणार नाही. मी माझ्या दर्ग्याचा एक इंच भागही गमावणार नाही. मी याची परवानगी देणार नाही. आम्ही येते येऊन मुत्सद्देगिरीची चर्चा करणार नाही. हे ते सभागृह आहे जिथे उभं राहून मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे की, माझ्या समुदायामधील लोक हे सन्माननीय भारतीय आहेत. ही आमची संपत्ती आहे. ती कुणीही आम्हाला दिलेली नाही. तुम्ही ती आमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाहीत, असेही ओवेसी म्हणाले.