"आपल्याला कुर्बानी देण्यासाठी तयार राहावं लागेल’’, वक्फ विधेयकावरून महमूद मदनींचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 16:39 IST2025-03-17T16:38:10+5:302025-03-17T16:39:13+5:30
Waqf Board Amendment Bill: केंद्र सरकारने तयार केलेल्या वक्फ (दुरुस्ती) विधेयकाविरोधात जंतरमंतरवर मोठ्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या मुस्लिम संघटनांचे प्रमुख आणि राजकीय पक्षांचे नेते सहभागी होत आहेत.

"आपल्याला कुर्बानी देण्यासाठी तयार राहावं लागेल’’, वक्फ विधेयकावरून महमूद मदनींचं आवाहन
केंद्र सरकारने तयार केलेल्या वक्फ (दुरुस्ती) विधेयकाविरोधात जंतरमंतरवर मोठ्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या मुस्लिम संघटनांचे प्रमुख आणि राजकीय पक्षांचे नेते सहभागी होत आहेत. या आंदोलनादरम्यान जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी मोठं विधान केलं आहे. आपण याला विरोध केला पाहिजे, आपल्याला कुर्बानी देण्यासाठी तयार राहावं लागेल, असं आवाहान केलं आहे.
महमूद मदनी म्हणाले का, हा विषय मुस्लिमांचाच उरलेला नाही. आमच्या घरांवर मशिदींवर बुलडोझर चालवले जातात. असं करून एकप्रकारे संविधानावरच बुलडोझर चालवला जात आहे. आपल्याला कुर्बानी देण्यासाठी तयार राहावं लागेल. पण याला विरोध केला पाहिजे.
तत्पूर्वी काँग्रेसचे नेते सलमान खु्र्शिद, इम्रान मसूद यांच्यासह एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी इम्रान मसूद आंदोलकांना संबोधित करताना म्हणाले की, आज या देशात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की, कायद्याच्या उडघडपणे ठिकऱ्या उडवल्या जात आहेत. मी या लढाईमध्ये माझ्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या वतीने छोटीशी भागीदारी देण्यासाठी तुमच्यामध्ये आलो आहे.
दरम्यान, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना वक्फ विधेयकाबाबत नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष खासदार जगदंबिका पाल यांनी जंतर मंतरवर सुरू असलेलं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे.