वक्फ बोर्डचा 'कारनामा'! १५०० वर्ष जुनं अख्खं गावच हडपलं, किरण रिजिजूंनी संसदेत सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 05:36 PM2024-08-08T17:36:03+5:302024-08-08T17:37:00+5:30
वक्फ बोर्ड कायद्यातील सुधारणा विधेयकावेळी संसदेत मंत्री किरण रिजिजू यांनी वक्फ बोर्डाकडून संपत्तीवर दावा केल्यानंतर झालेल्या वादाची काही उदाहरणं सादर केली.
चेन्नई - केंद्र सरकारने गुरुवारी संसदेत वक्फ बोर्ड अधिनियमात संशोधन करणारे विधेयक सादर केले. या विधेयकाला अखिलेश यादव, के.सी वेणुगोपाल, असदुद्दीन ओवैसीसह विरोधकांनी विरोध करत सरकारवर प्रश्नचिन्ह उभे केले. मात्र जेडीयू आणि टीडीपीनं या विधेयकाचे समर्थन केले. या विधेयकावेळी संसदीय मंत्री किरण रिजिजू यांनी तिरुचिरापल्ली इथल्या तिरुचेंथुरई गावातील घटना सांगितली ज्याठिकाणी हिंदू लोकसंख्या असलेल्या १५०० वर्ष जुन्या गावालाच वक्फ बोर्डानं वक्फची संपत्ती असल्याचं घोषित केले होते.
वक्फ बोर्डाने गावच्या जमिनीवर दावा केल्याचं कळताच गावकरीही हैराण झाले. हजारो वर्ष जुनी त्यांची वडिलोपार्जित संपत्ती वक्फची मालमत्ता कशी झाली हे कुणालाही कळालं नाही. वक्फ बोर्डाकडे जमिनीचा कुठलाही सबळ पुरावा नव्हता मात्र गावावर वक्फचा मालकी हक्क होता. तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीच्या तिरुचेंथुरई गावात २०२२ मध्ये पहिल्यांदा याची चर्चा झाली. कावेरी नदी किनारी जमीन असलेल्या गावातील राजगोपालनं मुलीच्या लग्नासाठी १.२ एकर जमीन विकण्याचा निर्णय घेतला. जेव्हा तो रजिस्ट्री कार्यालयात पोहचला तेव्हा ही जमीन विकण्यासाठी वक्फ बोर्डाची एनओसी लागेल असं त्यांना सांगण्यात आले. गावच्या जमिनीवर वक्फची मालकी असल्याचं त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितले.
विना परवाना ही जमीन विकता येणार नाही ही गोष्ट राजकुमारला समजली. त्यानंतर गावात गोंधळ उडाला. गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. आमच्या गावचा १५०० वर्ष जुना इतिहास आहे मग ती वक्फची प्रॉपर्टी होऊ शकत नाही. हिंदू बहुल गावात मुस्लीम लोकसंख्या असल्याचा इतिहासही नाही अशी तक्रार गावकऱ्यांनी केली. जेव्हा वाद वाढला तेव्हा वक्फ बोर्डाने रानी मंगम्मलशिवाय अनेक स्थानिक राजांनी तिरुचेंथुरईची जमीन वक्फ बोर्डाला गिफ्ट दिली होती असा दावा केला. वक्फ बोर्डाने २२० पानांचे कागदपत्रेही तयार केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला.
या तपासात गावातील १५०० वर्ष जुन्या चंद्रशेख स्वामी मंदिरात लिहिलेला शिलालेख समोर आला. मंदिराच्या भिंतीवर गावातील शेकडो एकर जमीन मंदिराची आहे असं लिहिलं होते. त्यानंतर गावकऱ्यांचा दावा मजबूत झाला. मात्र वक्फ बोर्डाने गावातील जमीन कधी आणि कशी त्यांची संपत्ती झाली त्याचा कुठलाही पुरावा दिला नाही. जेव्हा हे प्रकरण चर्चेत आले तेव्हा वक्फ बोर्ड अधिनियमात बदल करण्याची मागणी उठली. त्यानंतर देशातील अनेक भागात सरकारी आणि खासगी जमिनीवर वक्फची संपत्ती घोषित केल्याचं समोर आले.
अल्लाहची जमीन सुरक्षित राहावी यासाठी वक्फ बोर्ड
वक्फचा अर्थ अल्लाहच्या नावे, जे लोक त्यांची संपत्ती अल्लाहच्या नावे करतात त्यांना वक्फ संपत्ती म्हटलं जाते. आतापर्यंतच्या तरतुदीत कुठल्याही जमिनीवर वक्फ बोर्ड त्यांची संपत्ती म्हणून घोषित करू शकत होते. संपत्ती घोषित केल्यावर कुठल्याही व्यक्तीचा अथवा संस्थेचा मालकी हक्क राहत नाही. मुस्लीम समाजाशी निगडीत मस्जिद, कब्रिस्तान, मदरसे आणि मजारसारख्या जागांचा वक्फ बोर्डाच्या मालमत्तेत समावेश आहे. वक्फ बोर्ड या संपत्तीवर नियंत्रण ठेवते. वक्फ बोर्डावर या संपत्तीला विकण्याचा आणि त्यांचा आर्थिक वापर करण्याचा आरोप नेहमी लागतो.