काळ्या पैशाविरुद्धचे युद्ध सुरूच राहील
By admin | Published: April 10, 2017 11:52 PM2017-04-10T23:52:16+5:302017-04-10T23:52:16+5:30
काळ्या पैशाविरोधातील युद्ध एखाद्या कारवाईने संपत नाही तर मोदी सरकार या संदर्भात आणखी पावले उचलणार आहे, असे केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी म्हटले.
नवी दिल्ली : काळ्या पैशाविरोधातील युद्ध एखाद्या कारवाईने संपत नाही तर मोदी सरकार या संदर्भात आणखी पावले उचलणार आहे, असे केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी म्हटले. तमिळनाडूतील आर. के. नगर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूक निवडणूक आयोगाने तेथे पैशांचा वापर होत असल्याच्या कारणावरून रद्द केली.
या निर्णयाचे नायडू यांनी समर्थन केले. पैशांचा वापर होत असल्याचे आरोप होत असताना निवडणूक आयोगाने निवडणूक रद्द करून योग्य निर्णय घेतला, असे सांगून नायडू
यांनी काँग्रेसच्या राजवटीत हजारो कोटी रुपयांचे घोटाळे झाले
व त्यामुळेच काळा पैसा तयार झाला, अशा शब्दांत काँग्रेसवर हल्ला
केला.इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम) फेरफार केले जात असल्याचा विरोधी पक्षांचा
आरोप नायडू यांनी फेटाळला. मतदारांनी आपल्याला नाकारल्यामुळे आपला पराभव झाला हे ते
स्वीकारत नाहीत. उलट विरोधकांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे
नायडू म्हणाले.
चिदंबरम यांची टीका
- आर. के. नगर मतदार संघातील पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा हा अपेक्षित परिणाम आहे का, असा खोचक प्रश्न त्यांनी विचारला.
- नोटाबंदीच्या निर्णयाने आम्ही काळा पैसा संपवला आहे, असे आम्हाला सांगितले गेले होते. आर. के. नगर मतदार संघात वाटले गेलेले पैसे पांढरे होते का?, असे चिदंबरम टिष्ट्वटरवर म्हणाले. आर. के. मतदार संघात १२ एप्रिल रोजी मतदान होणार होते. पैशांचा वापर करून पक्षांनी निवडणूक प्रक्रिया दूषित करून टाकली असल्याचे ते म्हणाले.
- ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना मोदी यांनी आता काळापैसा नियंत्रणात येईल व इतरही सकारात्मक परिणाम होतील, असे सांगितले होते, असे चिदंबरम म्हणाले. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनामुळे आर. के. नगर मतदार संघात पोटनिवडणूक जाहीर झाली होती.