ज्या व्यक्तीवरून गलवान खोऱ्याचे पडले नाव, त्याच्या वारसांनी भारत-चीन वादावर दिली अशी प्रतिक्रिया...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 04:28 PM2020-06-18T16:28:05+5:302020-06-18T16:36:32+5:30
१५-१६ जूनच्या रात्री झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आलेले आहेत, अशा तणावाच्या परिस्थितीत या गलवान खोऱ्याला ज्या गुलाम रसूल गलवानच्या नावाने ओळखले जाते त्याच्या वारसांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
लेह (लडाख) - लडाखमधील गलवान खोऱ्यात सध्या भारत आणि चीनच्या सैन्यदलांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. १५-१६ जूनच्या रात्री झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आलेले आहेत, अशा तणावाच्या परिस्थितीत या गलवान खोऱ्याला ज्या गुलाम रसूल गलवानच्या नावाने ओळखले जाते त्याच्या वारसांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
"गेल्या काही दिवसांपासून गलवान खोऱ्यात खूप काही घटना घडत आहेत. या भागाशी आमचा गेल्या दोनशे वर्षांपासूनच संबंध आहे. युद्ध हा या वादावरील पर्याय असू शकत नाही तर हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवला जावा," असे गुलाम रसूल गलवान याचे वारस अमिन गलवान यांनी सांगितले.
There are a lot of activities happening in #GalwanValley these days. The area belongs to us for the last over 200 years... War is not a solution & the issue should be resolved through talks: Amin Galwan, grandson of Ghulam Rasool Galwan after whose name Galwan valley was named pic.twitter.com/WyfRNDStIm
— ANI (@ANI) June 18, 2020
लडाखमधील गलवान खोरे आणि गलवान नदी भारतासाठी सामरिकदृष्ट्या खूप महत्वाची आहे. याच ठिकाणी 1962, 1975 आणि सोमवारी चीनसोबत संघर्ष झाला होता. गलवान खोऱ्याचा इतिहास 121 वर्षे जुना आहे. या खोऱ्याचे नावही भारतीय नागरिकावरून पडलेले आहे. लडाखमधील गुराखी गुलाम रसूल गलवान याने ही घाटी शोधली होती. गुलमाने त्याच्या पुस्तकातील "द फाइट ऑफ चाइनीज" या अध्यायामध्ये याबाबत सांगितले आहे.
गुलामचा जन्म 1878 मध्ये झाला होता. वयाच्या 14 व्या वर्षी त्याने घर सोडले होते. त्याच्या डोक्यात केवळ नवीन जागा शोधण्याचे विचार घोळत असायचे. याच त्याच्या छंदाने त्याला इंग्रजांचा आवडता गाईड बनविले. खरे पाहता लडाखचा भाग इंग्रजांना आवडत नव्हता.
1899 मध्ये गुलामने लेहहून ट्रेकिंग सुरु केली. आणि लडाखच्या आसपासच्या अनेक नवीन भागांमध्ये पोहोचला. यामध्ये एक होती गलवान खोरे आणि नदी. ही एक ऐतिहासिक घटनाच मानावी लागेल कारण या नदीचे आणि खोऱ्याचे नाव एका गुराख्यावरून ठेवण्यात आले. गुलामने गलवान नावामागे त्याच्या आईने ऐकवलेली कहानी सांगितली आहे. तेव्हा काश्मीरच्या खोऱ्यामध्ये हिंदू महाराजांचे राज्य होते. त्याच्या वडिलांचे नाव कर्रा गलवान होते. कर्रा म्हणजे काळा आणि गलवान म्हणजे डाकू, दरोडेखोर. कर्रा त्याच्या टोळक्याचा म्होरक्या होता. तो फक्त श्रीमंतांना लुटत होता आणि मिळालेला पैसा गरीबांमध्ये वाटत होता.
काही काळानंतर गुलामच्या वडिलांना म्हणजेच कर्राला डोगरा राजाच्या शिपायांनी पकडले आणि मृत्यूदंड दिला. यानंतर गलवान टोळीचे लोक लेह आणि बाल्टिस्तानमध्ये स्थलांतरित झाले. तर काही गलवान हे चीनच्या शिंजियांग प्रांताच्या यारकन्दमध्ये स्थायिक झाले. फॉरसिकिंग पॅराडाईज पुस्तकानुसार गुलाम रसूल 15 महिन्यांमध्ये आशिया आणि तिबेटची कठीण यात्रा केली होती. लेहच्या चंस्पा योरतुंग रोडवर गुलाम रसूलच्या पूर्वजांचे घर आहे. त्यांच्या नावे गलवान गेस्ट हाऊसही आहे. आता त्यांची चौथी पीढी तिथे राहत आहे. त्यांचे वारसदार येणाऱ्या पाहुण्यांना रसूलचे किस्से सांगतात.