पाकिस्तानशी युद्ध हा पर्याय नाही, रक्तपात रोखण्यासाठी चर्चा करू या- मेहबुबा मुफ्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 04:44 PM2018-02-12T16:44:47+5:302018-02-12T17:05:10+5:30
सुंजवानमधल्या लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा श्रीनगरमधल्या करणनगरमधल्या सीआरपीएफ हेडक्वॉर्टरवर हल्ला केला आहे.
जम्मू-काश्मीर- सुंजवानमधल्या लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा श्रीनगरमधल्या करणनगरमधल्या सीआरपीएफ हेडक्वॉर्टरवर हल्ला केला आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यांत लष्कराच्या जवानांबरोबरच स्थानिकांनाही हकनाक प्राण गमवावे लागत आहेत.
तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पाकिस्तानबरोबर युद्ध हा पर्याय नाही, असं म्हटलं आहे. काश्मीरमधील हिंसाचार थांबवण्यासाठी पाकिस्तानबरोबर चर्चेशिवाय पर्याय नाही. रक्तपात रोखण्यासाठी ते गरजेचं आहे. मला माहीत आहे की, टीव्ही न्यूज चॅनेलच्या अँकरकडून मला देशद्रोही ठरवलं जाईल. मला याचा काही फरक पडत नाही. जम्मू-काश्मीरची माणसे त्रास सहन करतायत. त्यामुळे पाकिस्तानशी चर्चा करावीच लागेल. युद्धा हा काही पर्याय असू शकत नाही, असं मेहबुबा मुफ्ती ट्विटर अकाऊंटवरून म्हणाल्या आहेत.
Dialogue with Pakistan is necessary if we are to end bloodshed. I know I will be labelled anti-national by news anchors tonight but that doesn’t matter. The people of J&K are suffering. We have to talk because war is not an option.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) February 12, 2018
गेल्या काही दिवसांपूर्वीच विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानशी युद्धाशिवाय पर्याय नाही, असं म्हटलं आहे. सीमेवर पाकिस्तान व दहशतवाद्यांच्या गोळीबारात सैनिक शहीद होत आहेत. कधीपर्यंत सैनिकांना शहीद होऊ द्यायचे. चर्चा खूप झाली, भाषणही नको आता थेट पाकिस्तानशी युद्ध करा. मिसाईल, टँकचा वापर करून हल्ला करा'', असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी येथे केले होते.