वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग; राज्याकडून जमिनीची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 05:46 AM2021-03-11T05:46:37+5:302021-03-11T05:47:08+5:30
प्रकल्प खर्च ३,१६८ कोटी रुपये : १५०० हेक्टर्स जमीनच मिळाली
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : वर्धा-नांदेड मार्गे यवतमाळ, पुसद या ३,१६८ कोटी रुपयांच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारकडून जमीन हस्तांतरित होण्याची प्रतीक्षा आहे. एकूण १,८११.७३ हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी आवश्यक असून, राज्य सरकारने ३५६.१८ हेक्टर महसूल जमीन आणि १००.५९ हेक्टर वन जमीन संपादित करणे तातडीचे आहे. रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत बुधवारी ही माहिती दिली.
वर्ष २००८-२००९ मध्ये २८४ किलोमीटरचा नवा रेल्वे मार्ग प्रकल्प खर्च वाटून घेण्याच्या तत्त्वावर मंजूर झाला होता आणि १,३६२ कोटी रुपयांचा खर्च करण्यातही आला. राज्याच्या वाट्यासह ४५० कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद २०२०-२०२१ वर्षात करण्यातही आली आहे. राज्य सरकारने फक्त १५०० एकर जमीन हस्तांतरित केली असून, राहिलेल्या जमिनीची प्रतीक्षा आहे. वर्धा-यवतमाळ सेक्शन (७८ किलोमीटर) : एजन्सीज अंतिम करण्यात येऊन उपलब्ध जागेत काम हातीही घेण्यात आले आहे. यवतमाळ-नांदेड सेक्शन (२०६ किलोमीटर) : यवतमाळ ते दिग्रस या ७९ किलोमीटरसाठी एजन्सीज अंतिम करण्यात आल्या आहेत. राहिलेल्या १२७ किलोमीटरसाठी निविदा या वन खात्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर व महसूल जमिनीचा ताबा मिळाल्यानंतर निघतील.
वर्धा-नांदेड राष्ट्रीय महामार्गादरम्यान होणाऱ्या चार रोड
ओव्हर ब्रिजेस, रोड अंडर ब्रिजेसच्या बांधकामाची
तरतूद खालीलप्रमाणे करण्यात आली आहे.
विजय दर्डा यांचा पुढाकार व पाठपुरावा
nवर्धा-यवतमाळ-नांदेड हा विदर्भ-मराठवाड्याला जोडणारा २८४ किलोमीटरचा रेल्वे प्रकल्प फेब्रुवारी २००८ ला जाहीर झाला. लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांचा पुढाकार व पाठपुराव्यातून हा प्रकल्प जिल्ह्यात आणला गेला.
n११ फेब्रुवारी २००९ ला तत्कालीन रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांनी या मार्गाचे भूमिपूजन केले. ६० टक्के केंद्र शासनाचा निधी आणि ४० टक्के राज्य शासनाचा निधी या तत्वावर हा प्रकल्प राबविला जात आहे. २७४ कोटी ५३ लाख मूळ किंमत असलेला हा प्रकल्प आता अडीच हजार कोटींवर गेला आहे.
१) वर्धा-यवतमाळ दरम्यान राष्ट्रीय महामार्ग ३६१ वर १२,२२१ मीटरचा रोड ओव्हरब्रिज
२) वर्धा-यवतमाळ दरम्यान राष्ट्रीय महामार्ग ३६१ वर ७६,५४० मीटरचा रोड ओव्हरब्रिज
३) यवतमाळ-नांदेड दरम्यान बारसगाव गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग २२२ वर रोड अंडरब्रिज
४) यवतमाळ-नांदेड दरम्यान मनाठा गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ३६१वर रोड अंडरब्रिज